Medical Store: महत्वाची बातमी! २० मे रोजी औषधांच्या शटरला कुलूप; रुग्णांच्या कपाळावर आठ्या !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ मे २०२६ ।।महाराष्ट्रात राजकारणाचे मोर्चे, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आणि कर्मचाऱ्यांचे संप नागरिकांनी अनेकदा पाहिले; पण आता थेट औषधांच्या दुकानांनीच बंदची घंटा वाजवली आहे. २० मे २०२६ रोजी पुण्यासह राज्यातील सर्व मेडिकल दुकाने बंद राहणार असल्याने सामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. “गोळी घ्यायला गेलो तर दुकानच बंद!” अशी अवस्था होणार की काय, असा प्रश्न रुग्णांच्या घराघरांत ऐकू येऊ लागला आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने देशव्यापी बंदची घोषणा केली असून महाराष्ट्रातील औषध विक्रेतेही त्यात पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहेत.

ऑनलाईन विक्रीचा धडाका; छोट्या दुकानदारांचा धंदा धोक्यात!
या बंदमागचे कारण केवळ व्यवसायिक नाही तर आरोग्याशी संबंधित असल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या ऑनलाईन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. मोबाईलवर क्लिक केले आणि घरपोच औषध आले, ही सोय दिसायला आकर्षक असली तरी त्यामागे तपासणी कोणाची, परवानगी कुणाची आणि जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी औषध व्यवसायात टाकलेल्या पैशांच्या पावसामुळे छोट्या मेडिकल चालकांचा संसार कोरडा पडू लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

निवेदनांची धूळ झटकली नाही; म्हणून बंदचा इशारा
संघटनेच्या म्हणण्यानुसार, या प्रश्नावर केंद्र सरकारच्या संबंधित मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देण्यात आली. बैठका झाल्या, चर्चा रंगल्या, आश्वासने मिळाली; पण प्रत्यक्षात मात्र कारवाईचा दिवा पेटलाच नाही. त्यामुळे “आता शांत बसून उपयोग नाही” या भूमिकेतून देशभरातील औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय बंदचे हत्यार उपसले आहे. पुणे शहरासह महाराष्ट्रातील मेडिकल चालकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला असून २० मे रोजी बहुतांश औषध दुकाने बंद राहणार आहेत. परिणामी, नियमित औषधे घेणाऱ्या रुग्णांनी आधीच आवश्यक साठा करून ठेवावा, असा सल्ला दिला जात आहे.

बंद असला तरी जीवाशी खेळ नाही; अत्यावश्यक औषधे मिळणार
औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये, याची खबरदारी संघटनेकडून घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अत्यावश्यक औषधे आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध राहतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे बंदचा उद्देश रुग्णांना अडचणीत आणणे नसून सरकारचे लक्ष वेधणे हा असल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले. मात्र, एका दिवसासाठी का होईना, मेडिकलची शटर खाली जाणार हीच बातमी नागरिकांच्या धडधडीचे कारण ठरत आहे. कारण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज चुकू शकतो, निवडणुकीचे निकाल उलटे लागू शकतात; पण “मेडिकल बंद” ही बातमी ऐकली की सामान्य माणसाचा रक्तदाब मात्र हमखास वाढतो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *