महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ मे २०२६ ।। SSC Exam Result 2026 पुणे : महाराष्ट्रातील लाखो दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आणि पालकांची महिनोंपासूनची उत्सुकता अखेर संपणार असून, निकालाच्या क्षणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हा निकाल पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतलेल्या फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचा आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबर आणि आईच्या नावाच्या आधारे ऑनलाईन गुण पाहता येणार आहेत. सकाळी 11 वाजता मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची टक्केवारी आणि महत्त्वाची माहिती जाहीर केली जाणार आहे.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना काही अधिकृत संकेतस्थळांचा वापर करता येणार आहे. त्यामध्ये mahahsscboard.in, sscresult.mahahsscboard.in, sscresult.mkcl.org, results.digilocker.gov.in तसेच इतर अधिकृत पोर्टल्सचा समावेश आहे. या वेबसाईटवर लॉगिन करून विद्यार्थी काही मिनिटांतच आपला निकाल पाहू शकतील. निकाल पाहण्याची प्रक्रिया सोपी असून, फक्त रोल नंबर आणि आईचे नाव भरल्यानंतर स्क्रीनवर गुणपत्रक दिसेल.
ऑनलाईन निकाल तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध होणार असून, मूळ गुणपत्रक नंतर शाळांमधून दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकालाची प्रिंट काढून ठेवावी, असा सल्ला देण्यात आला आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच सोशल मीडियावर उत्सुकता शिगेला पोहोचली असून, उद्या दुपारी 1 वाजता अनेक घरांमध्ये आनंद-चिंतेचा क्षण एकत्र अनुभवला जाणार आहे.