![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ मे २०२६ ।। जगाच्या रणांगणावर उडणाऱ्या क्षेपणास्त्रांचा आवाज आता थेट बार काऊंटरपर्यंत पोहोचू लागला आहे. इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आणि त्याचा थेट फटका भारतातील मद्य उद्योगाला बसू लागला आहे. दारू, बिअर आणि वाइन कंपन्यांनी आता राज्य सरकारांकडे दरवाढीसाठी हात पसरण्यास सुरुवात केली असून, लवकरच ‘घोट-घोट’ महाग होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
काचेच्या बाटल्या, ॲल्युमिनियम कॅन आणि पॅकेजिंग साहित्याच्या वाढत्या खर्चामुळे कंपन्यांचा तोल ढासळू लागला आहे. बिअर उत्पादकांनी तर थेट १५ ते २० टक्के दरवाढीची मागणी केली आहे. देशातील मोठ्या मद्य कंपन्यांचा दावा असा की, जुन्या दरात व्यवसाय चालवणं आता म्हणजे तोट्याच्या विहिरीत बादली टाकण्यासारखं झालं आहे. ग्राहकांच्या खिशावरचा ताण वाढणार हे जवळपास निश्चित मानलं जात असलं, तरी उद्योग क्षेत्र म्हणतंय — “आता पर्यायच उरलेला नाही!”
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधील काच उद्योगाला गॅस टंचाईचा जबर फटका बसल्याने बाटल्यांच्या उत्पादन खर्चाने अक्षरशः आग पकडली आहे. काही कारखाने बंद होण्याच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मध्यपूर्वेतील तणावामुळे ॲल्युमिनियमचा पुरवठाही विस्कळीत झाला असून, बिअर कॅनची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणजेच पुढच्या काळात बारमध्ये “ब्रँड नाही मिळाला” हे वाक्य अधिक ऐकायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, वाढत्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी मद्य कंपन्यांनी उत्पादन शुल्कात सवलत देण्याची मागणी केली आहे. पण सरकार दर कमी करणार की ग्राहकांच्या खिशालाच पुन्हा हात घालणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत, युद्ध हजारो किलोमीटर दूर असलं तरी त्याची झळ आता भारतीयांच्या ग्लासपर्यंत पोहोचू लागली आहे. पुढच्या काळात ‘चिअर्स’ म्हणण्याआधी खिशाची तपासणी करावी लागणार, इतकं मात्र निश्चित!
