![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २४ डिसेंबर २०२५ | पुणे–मुंबई प्रवास म्हणजे कायमची डोकेदुखी. रस्ता गेला की ट्रॅफिक, रेल्वे गाडी पकडली की उशीर, आणि म्हणून श्रीमंतांनी शोध लावला – हेलिकॉप्टर! पण आता या आभाळात उडणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा नाही. कारण हेलिकॉप्टर उडतंय ते आकाशात, पण वेळ मात्र १२ मिनिटांनी वाढली आहे.
२४ डिसेंबरपासून पुणे–मुंबई–पुणे हेलिकॉप्टर मार्ग बदलतोय. कारण काय? तर नवी मुंबई विमानतळ सुरू होतोय. विमानं येणार, जाणार… आणि हेलिकॉप्टर म्हणतंय, “साहेब, आम्हाला थोडं बाजूला फिरू द्या!” म्हणजे रस्त्यावर जशी वळणं वाढतात, तसंच आता आकाशातही वळणं वाढलीत.
पूर्वी हेलिकॉप्टर सरळसोट पुणे–लोणावळा–पनवेल–जुहू.
आता मात्र नवी मुंबई विमानतळाजवळ थांबा, होल्डिंग एरिया, डावीकडे वळा, उजवीकडे वळा… म्हणजे GPS नव्हे, तर संयम लागणार!
हेलिकॉप्टर चार हजार फूट उंचीवर उडणार, पण प्रवाशाचा मूड मात्र जमिनीवर येणार. कारण जो माणूस हेलिकॉप्टर पकडतो, तो वेळ वाचवण्यासाठी. पण आता त्यालाच सांगितलं जातंय – “थोडा उशीर होईल.” म्हणजे गरीब माणसाला रस्त्यावर ट्रॅफिक, श्रीमंताला आकाशात!
नवी मुंबई विमानतळ सुरू होत आहे, ही मोठी गोष्ट. पण त्यासाठी हेलिकॉप्टरचा मार्ग बदलावा लागतो, हा विकासाचा साईड इफेक्ट. विमानांना अडथळा होऊ नये म्हणून हेलिकॉप्टरने स्वतःच अडथळा बनून घ्यायचा – हेच ते नियोजन!
महालक्ष्मी, जुहू, पुणे… प्रत्येक मार्गाला नवं वळण, नवी उंची, नवा नियम. कधी अटल सेतूच्या बाजूने, कधी कर्नाळा किल्ल्याजवळून, तर कधी भाऊचा धक्का, बुचर आयलंड असा पर्यायी मार्ग. म्हणजे प्रवास नाही, हवाई दर्शनयात्रा सुरू झाली आहे.
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे –
भाडं वाढणार का?
कारण वेळ वाढली की पेट्रोल वाढतं, आणि पेट्रोल वाढलं की बिल वाढतं. पण यावर अधिकारी म्हणतात, “अजून स्पष्ट नाही.” म्हणजे प्रवाशांनी आधी उडावं, नंतर बिल पाहावं!
हेलिकॉप्टर प्रवास म्हणजे लक्झरी मानली जाते. पण आता त्या लक्झरीलाही नियम, वळणं आणि प्रतीक्षा. फरक एवढाच की, गरीब माणूस रस्त्यावर थांबतो… आणि श्रीमंत माणूस आकाशात होल्डिंग एरियात!
शेवटी एवढंच खरं –
रस्ता असो, रेल्वे असो किंवा हेलिकॉप्टर…उशीर हा सगळ्यांसाठी समानच आहे!
