महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.९ डिसेंबर ।। फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातून थंडी गायब झाली होती. आता पुन्हा एकदा तापमानाचा पारा घसरण्यास सुरूवात झाली आहे. राज्यातील तापमानात एकच दिवशी ४ अंशांनी घासरले आहे. राज्यातील बहुतांश शहरात हुडहुडी वाढणार आहे. उत्तर भारतात मार्गस्थ होत असलेले पश्चिमी वारे व समुद्र सापटीपासून वाहणारे वारे यामुळे थंडी वाढणार आहे.
थंडीचे कमबॅक, शेकोट्या पेटल्या –
फेंगल वादळाचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढायला लागली आहे. पुण्यासह राज्यातील तापमानात एका दिवसात ४ अंशांनी घट झाल्याने बहुतांश शहरात हुडहुडी भरण्यास सुरूवात झाली.
पुण्यात अचानक रविवारी थंडीत वाढ झाली आणि किमान तापमान १६ अंशांवर नोंदवले गेले. संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे १८ डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत ‘फेंगल’ चक्रीवादळाने थंडी गायब झाली होती . मात्र आता पुन्हा उत्तर भारतात मार्गस्थ होत असलेले पश्चिमी वारे आणि समुद्र सपाटीपासून साडेबारा किमी उंचीवर वाहणारे उच्च वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या झोतामुळे थंडीत होणारं वाढ होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात थंडीचे कमबॅक ११ अंशावर
गेल्या आठवडाभरात बंगालच्या उपसागरावर आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील थंडी गायब झाली होती. मात्र, आता फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्यामुळे जिल्ह्यासह राज्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण कमी होऊन, कोरडे हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असून, रविवारी जळगाव शहराचा पारा ११ अंशांवर आला होता. शुक्रवारी जळगाव शहराचा रात्रीचा पारा १८ अंशांपर्यंत गेला होता. मात्र, आता उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यात थंडीचे पुनरागमन झाले आहे.
निफाडमध्ये सर्वात निचांकी तापमान –
थंडी पुन्हा परतली आहे. नाशिक आणि निफाडमध्ये तापमानात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. तापमानात घट झाल्यानं नाशिक आणि निफाडकरांना हुडहुडी भरली आहे. निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात नीच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडमध्ये किमान ६.७ अंश सेल्सिअस इतक्या नीच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिकचा पारा ९.४ अंशावर घसरला आहे. कडाक्याच्या थंडीने निफाड, नाशिककर गारठले आहेत.
भंडाऱ्यात अवकाळी पाऊस बरसला…
मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात वातावरणात बदल झाल्यानं ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली होती. अचानक अवकाळी पावसाने भंडाऱ्यात हजेरी लावली. यामुळे मळणी करून ठेवलेल्या भात पिकाचं काही प्रमाणात नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर, या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे.