Video ; अजितदादा थेट शरद पवारांच्या भेटीला; छगन भुजबळ, सुनील तटकरे उपस्थित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ डिसेंबर ।। राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीतील ६ जनपथ येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी देखील उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार सहकुटुंब शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. शरद पवारांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते याठिकाणी आले असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवारांसोबत त्यांची पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार यांची ही भेट आहे. सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील राष्ट्रवादीचे कार्यालय असलेल्या बलार्ड इस्टेट भागात पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. ‘राजकारणातील सह्याद्री’ असा उल्लेख करून शरद पवार यांची कारकीर्द या पोस्टरवर लावण्यात आलेली आहे . त्याचबरोबर इतरही पोस्टर लावून शरद पवार यांच्या पक्षाकडून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे .

शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे.

शरद पवारांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून कॅप्शनमध्ये ‘गेली ६ दशकं ज्या धोरणी नेत्याच्या सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीने आपल्या राष्ट्राला-महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेलं त्या आदरणीय पवारसाहेबांचं अभिष्टचिंतन करूया #UntoldStoriesOfPawarSaheb ह्या गौरवकथांच्या माध्यमातून!’, असे लिहिण्यात आले आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी देखील एक्सवर पोस्ट करत शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *