येत्या पाच दिवसात 2-3 अंशांनी तापमान वाढणार? वाचा IMD चा सविस्तर अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ डिसेंबर ।। राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा गारठलाय. राज्यात अनेक भागात किमान तापमान 10 अंशांच्या खाली पोहोचले. उत्तर महाराष्ट्रात तर तापमान 4-5 अंशावर पोहोचले होते. मुंबईकरांना 9 वर्षांनंतर सर्वात कमी तापमानाची नोंद झाल्यानं हुडहुडी भरली होती. पण आता भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने दिलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहणार असून हवामान कोरडेच राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या चार ते पाच दिवसात थंडीचा कडाका काहीसा कमी होऊन किमान तापमानात हळूहळू 2-3 अंशांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागानं उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीच्या लाटेचा इशारा दिलाय. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये 11 ते 13 डिसेंबरपर्यंत हाडं गोठवणारी थंडी राहणार आहे. उत्तराखंडमध्ये तर जमीन गोठणार असल्याचं सांगण्यात आलंय. पण त्याचवेळी दक्षीणेकडे पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा विकसित होत असून केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेशात तुफान पावसाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहणार असून हवामान कोरडेच राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान येत्या दोन दिवसात एक ते दोन अंशांनी वाढण्याचा अंदाज भारतीय प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलाय.

पुण्यात धुक्याची चादर, कडाक्याची थंडी!
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडं हवामान राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान पुण्यात कडाक्याची थंडी पडली असून येत्या दोन दिवसात सकाळी विरळ धुक्याची चादर पसरून येत्या दोन ते तीन दिवसात कमाल व किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. दरम्यान, पुणेकरांना सध्या चांगलीच हुडहुडी भरली आहे. ठिकठिकाणी तापमान घसरल्यानं रस्त्यावर शेकाट्या पेटवून नागरिक ऊबेला बसल्याचं दिसतंय.

विदर्भातही गारठा वाढतोय
वाशिम जिल्ह्यात उशिरा का होईना..थंडी पडण्यास सुरवात झाली आहे. आता तापमानात मोठी घट झाल्याने, नागरिकांना थंडीची तीव्रता जाणवू लागली आहे. दिवसाचे तापमान 24° सेल्सिअस असताना संध्याकाळ नंतर 11° सेल्सिअसपर्यंत तापमान घसरत आहे, त्यामुळे थंडीची तीव्रता वाढत आहे. यामुळे ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत नागरिक शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र मिळतंय.

नाशिकमध्ये हुडहुडी, तापमान घसरले
उत्तरेकडील शीत लहरी महाराष्ट्रच्या दिशेन येत असल्याने नाशिकमधे कडाक्याची थंडी पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातील तपमानात घट झाल्यान नाशिककर गारठले आहे. निफडमध्ये आज 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारच्या तुलनेत पार दोन अंशांनी वाढला असला तरीही गारवा कायम दिसतोय. शेकोटी पेटवून नागरिक ऊब घेत आहेत. रब्बी पिकांना थंडी लाभदायक असली तरी द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *