वायू प्रदूषणामुळे देशात 10 वर्षात 38 लाख लोकांचा मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ डिसेंबर ।। भारतात गेल्या १० वर्षात वायू प्रदूषणामुळे सुमारे ३८ लाख जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ नामक वैद्यकीय नियतकालिकात ही माहिती प्रकाशित करण्यात आलीय.

‘द लॅन्सेट’च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, हवामानातील पीएम-2.5 कणांचा दीर्घकाळ संपर्क भारतातील लाखो लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. स्वीडनमधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासामध्ये देखील वायू प्रदूषणाच्या दीर्घकालीन संपर्कामुळे भारतात लाखो लोकांचा जीव जात असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेले हे संशोधन शरीरासाठी घातक असलेल्या हवामानातील पीएम-2.5 या लहान वायु प्रदूषण कणांवर केंद्रित आहे. ज्यांचा व्यास 2.5 मायक्रोमीटरपेक्षा देखील लहान असतो. हे कण मानवी फुफ्फुसात खोलवर जाऊन रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात, यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. देशभरातील हवेच्या गुणवत्तेचे नियम कडक करण्यासाठी तातडीची कारवाई करण्याची गरज देखील या संशोधनातून व्यक्त करण्यात आली आहे.

या संशोधनात 2009 ते 2019 या कालखंडातील भारताच्या 655 जिल्ह्यांतील डेटा गोळा करण्यात आला आहे. येथील हवामानातील पीएम-2.5 ची पातळी त्यांचा मानवी आरोग्यावरील परिणाम आणि हवामानातील या घटकाचा मृत्यूशी संबंध जोडण्यात आला आहे. हवामानातील पीएमची पातळी 10 मायक्रोग्राम प्रति घनमीटर वाढली की, मृत्यूमध्ये 8.6 टक्क्यांनी वाढ होते, असे अभ्यासात आढळले आहे. मागील दशकभरात भारतात प्रति घनमीटर 40 मायक्रोग्रॅम इतकी पीएमची पातळी वाढली आहे. काही वर्षात भारतात अंदाजे 38 लाख मृत्यू झाल्याचे ‘द लॅन्सेट’ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे.

भारतातील हवेच्या गुणवत्तेची सध्याची मार्गदर्शक तत्त्वे भारतीयांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पुरेशी नाहीत. उत्सर्जन कमी करण्यासाठी कठोर नियम आणि निर्णायक उपाययोजनांची तातडीने गरज असल्याचे कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटचे प्रमुख संशोधक पेटर लजंगमन यांनी सांगितले. भारताचा राष्ट्रीय वायू प्रदूषण नियंत्रण कार्यक्रम 2017 मध्ये सुरू करण्यात आला. ज्याचे उद्दिष्ट हवेची गुणवत्ता सुधारण्याचे आहे, मात्र देशातील अनेक भागांमध्ये पीएम-2.5 पातळी ही सतत वाढतच असल्याचे ‘द लॅन्सेट’मध्ये प्रकाशित लेखावरुन स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *