महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ डिसेंबर ।। लाडकी बहीण योजनेतल्या काही लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत अशा चर्चा सोशल मिडियावर पाहायला मिळत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी होईल, लाखों महिलांचे अर्ज बाद होतील, अशा अनेक चर्चा सध्या रंगत आहेत.
लाडकी बहीण योजनेबद्दल सुरू असलेल्या या सगळ्या चर्चांवर राष्ट्रवादीच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाचे स्पष्टीकरण दिलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अफवांच खंडन तटकरे यांनी एक पत्रक काढून केलं आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाचं या योजनेबाबतचं संभ्रम दूर करणारं पत्रक आता जारी करण्यात आलं आहे.
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. या योजनेत २ कोटीहून अधिक अर्ज आले असून दीड कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावर दर महिन्याला १५०० रुपये थेट जमा होत आहेत. मात्र आता या योजनेतील निकष बदलणार अशा बातम्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
आमदार आदिती तटकरे यांनी त्याबाबत खुलासा केला आहे. कोणत्याही अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. या योजनेचे निकष बदलणार नाहीत. तशा पद्धतीच्या कोणतेही लेखी आदेश, शासन निर्णय घेतलेला नाही, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरुच राहणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या ?
रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. ही योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.
एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. यासंबंधींचे त्यांचे ट्वीटही सध्या व्हायरल होत आहे.