महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ डिसेंबर ।। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनमधील गॅबा स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या दोन दिवसात तरी ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे वर्चस्व दिसून येत आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावले आहे. त्याचे हे या मालिकेतील सलग दुसरे शतक आहे. त्याने ऍडलेडला झालेल्या दुसऱ्या कसोटीतही शतक केले होते.
हेडला ११५ चेंडूत १३ चौकारांसह त्याचे शतक पूर्ण केले आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील नववे शतक आहे, तर भारताविरूद्धचे तिसरे शतक आहे. हेड या मालिकेत शानदार फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे.
तो चालू मालिकेत ३०० धावा करणाराही पहिला खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे द गॅबावर हेड याआधीच्या तीन डावात शून्यावर बाद झाला होता. पण तीन डावात शून्यावर बाद झाल्यानंतर आता त्याने शतक झळकावले आहे.
HE'S DONE IT AGAIN!
Travis Head brings up another hundred ⭐️#AUSvIND | #PlayOfTheDay | @nrmainsurance pic.twitter.com/10yBuL883X
— cricket.com.au (@cricketcomau) December 15, 2024
भारताविरुद्ध १००० धावा
हेडने हे शतक करताना भारताविरुद्ध कसोटीमध्ये १००० धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याने पहिल्यांदाच एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध कसोटीमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने भारताविरूद्ध १३ सामन्यांतील २२ डावात या १००० धावा पूर्ण केल्या आहेत. यामध्ये ३ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
टी ब्रेकपर्यंत हेड – स्मिथ यांच्यात दीडशतकी भागीदारी
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात हेड आणि स्मिथ यांच्यात चौथ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी झाली. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या टी ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने ७० षटकात ३ बाद २३४ धावा केल्या. टी ब्रेकपर्यंत स्मिथ ६५ धावांवर आणि हेड १०३ धावांवर नाबाद आहे.
ब्रिस्बेनमध्ये भारताविरुद्ध कसोटीत दीडशे धावांची भागीदारी करणारी हेड आणि स्मिथ यांची पहिलीच जोडी ठरली आहे. यापूर्वी २०१४ मध्ये स्मिथ आणि मिचेल जॉन्सन यांच्यात भारताविरुद्ध ब्रिस्बेनमध्य १४८ धावांची भागीदारी झाली होती.
या सामन्यात पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त १३.२ षटकांचा खेळ झाला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवशी एकही विकेट गमावली नव्हती. पण दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाच्या नॅथन मॅकस्विनी आणि उस्मान ख्वाजा या दोन्ही सलामीवीरांना जसप्रीत बुमराहने बाद केले.
पण नंतर मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संयमी खेळ करत डाव सावरला होता. पण त्यांची भागीदारी रंगत असतानाच नितीश कुमार रेड्डीने लॅबुशेनला १२ धावांवर माघारी धाडले. पण नंतर स्मिथ आणि हे़ड यांची जोडी जमली.
एक बाजू स्मिथने संयमी खेळत सांभाळली होती, तर हेडने दुसऱ्या बाजूने आक्रमक खेळ केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सहज २०० धावांचा टप्पा पार केला.