महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ डिसेंबर ।। महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेताच महाड शहरांमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला.
राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर सर्वांनाच मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. त्यातूनच महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांना गेले दोन अडीच वर्षे मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. त्यांच्या मंत्रिपदावरून अनेक वेळा त्यांची खिल्ली उडवून विरोधकांकडून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु अखेर महायुतीच्या सरकारमध्ये पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी स्थान मिळवले असून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशना अगोदर झालेल्या मंत्रीमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
त्यांनी शपथ घेताच महाड शहरातील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून एकच जल्लोष केला. फटाक्याची आतषबाजी, गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत एकमेकांना पेढे भरवून त्यांनी हा आनंद साजरा केला. यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेतून बाईक रॅली काढण्यात आली. मंत्रिमंडळ शपथविधीचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी शिवसेनेकडून महाड शहरातील चवदारतळे येथील श्रीराम मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या स्क्रीनवर हे प्रक्षेपण पहाण्याची मोफत सुविधा करून देण्यात आली होती. शिवसेनेचे माजी आमदार कै.प्रभाकर मोरे यांच्यानंतर तब्बल 15 वर्षानंतर पुन्हा एकदा महाड विधानसभा मतदारसंघात एखाद्या आमदाराने मंत्रिपद मिळविले असून अनेक वर्षांची ही प्रतीक्षा संपल्याने कार्यकर्ते व समर्थकांमध्ये समाधान दिसून येत आहे.