महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ डिसेंबर ।। विरोधी पक्षनेतेपदाबद्दल विचारले असता, ‘विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज करावा लागत नाही. सर्व विरोधी पक्षांना एकत्रित बोलावून या पदासाठी नाव मागितले जाते. हे नाव निश्चित झाल्यावर त्याची सभागृहात घोषणा होते. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत अद्याप कुठलीच पावले उचललेली नाहीत. यावरून सरकार याबाबत सकारात्मक नाही’, अशी टीका नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी केली. ‘आतापर्यंत विरोधी पक्षनेतेपदासाठी कुठलाही अर्ज आल्याचा नमुना असेल तर तो आम्हाला द्यावा. त्यानुसार आम्ही पुढची कार्यवाही करू,’ असे आव्हाड म्हणाले.
‘विदर्भात केवळ आठवडाभराचे अधिवेशन घेऊन महायुती सरकार देखावा करीत आहे. विदर्भाचे मुख्यमंत्री झाल्यावर नागपुरात पहिले अधिवेशन असताना, सरकारने वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. या सरकारला जनतेशी काहीही घेणेदेणे नाही,’ अशी टीका विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रपरिषदेत केली. विरोधकांची संख्या कमी असली तरी, अत्यंत ताकदीने सरकारला जाब विचारणार आहोत, असा इरादा विरोधकांनी जाहीर केला.
रविभवन परिसरात रविवारी झालेल्या विरोधकांच्या संयुक्त पत्रपरिषदेत वडेट्टीवार म्हणाले, बीडमध्ये एका सरपंचाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यातील आरोपीला राजकीय वरदहस्त आहे. खून करणाऱ्या आरोपीला राजकीय आश्रय देणारे मंत्री केले जाते. हे खुनी सरकार आहे आणि त्याचमुळे या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेतेपदावरून मतभेद नाहीत. मतभेदाच्या वावड्या उठवण्यात येत आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. काँग्रेस गटनेत्याची निवड १७ डिसेंबरला बैठकीनंतर करण्यात येईल, अशी माहितीही पटोले यांनी दिली.
