महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ डिसेंबर ।। मागील महिन्यात 10 किलोला 600 ते 700 रुपये पार केलेला कांदा या महिन्यात कांद्याचा भाव 300 ते 350 रुपयांवर उतरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वत्र कांदा लागवड सुरू आहे. त्यासाठी शेतकर्यांना कांदा रोपे उपलब्ध होत नाहीत, ज्यांच्याकडे उपलब्ध झाली आहेत, त्यांना कांदा लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत, अशीही अवस्था झालेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात नाराजी पसरलेली आहे.
नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा उच्चांकी बाजारभाव होता. चांगला जुना कांदा सुमारे 70 रुपये किलोपर्यंत विकला गेला होता. त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदीत होता. त्यानंतर केंद्र सरकारने अफगाणिस्तानचा कांदा आयात केला, या आयातीमुळे कांद्याचे बाजार भाव पडतील या विचाराने शेतकर्यांनी आपला जुन्या कांद्याबरोबर नवीन कांदा काढणीस सुरुवात केली.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जरी अफगाणिस्तानचा कांदा बाजारात येत होता, तरी 50 ते 60 रुपये एवढा भाव टिकून राहिला होता. मात्र मागील काही दिवसात ढगाळ वातावरण झाल्याने शेतकर्यांनी कांदा काढणीस मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली. त्यामुळे बाजारभाव गडगडायला सुरुवात झाली.
मंचर बाजार समितीत रविवारी (दि. 15) झालेल्या कांद्याच्या लिलावात सुमारे 24 हजार पिशव्या आल्या होत्या, त्यापैकी 214 पिशव्यांना 351 ते 400 रुपये 10 किलोस बाजारभाव मिळाला. सुपर कांदा 300 ते 350, सुपर मिडीयम कांदा 260 ते 320, गोल्टी कांदा 100 ते 300, तर बदला कांदा 60 ते 120 रुपये असा 10 किलोस बाजारभाव मिळाला.
लोणी उपबाजार समितीत झालेल्या लिलावामध्ये सुपर कांद्यास 330 ते 351, सुपर मिडीयम कांदा 230 ते 325 रुपये, गोल्टी कांदा 110 ते 220, बदला व चिंगळी कांदा 50 ते 100 रुपये असा 10 किलो बाजारभाव मिळाले.
एकीकडे कांदा काढणी सुरू असतानाच ज्या शेतकर्यांची कांदा काढून शेती दुसर्या पिकासाठी तयार झाली आहे. त्या शेतकर्यांनी कांदा लागवडी सुरू केल्या आहेत. बहुतांश शेतकरी हे बाजारामध्ये असणार्या कांद्याच्या बियाण्यापेक्षा परिसरातील शेतकर्यांकडील खात्रीशीर बियाणे घेऊन रोपे तयार करत असतात. तर काही शेतकरी ज्या शेतकर्यांकडे मोठ्या प्रमाणावर रोपे उपलब्ध आहेत, त्यांच्याकडून विकत घेत लागवड करतात.