महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ डिसेंबर ।। पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा खडतर प्रवास काही संपण्याची चिन्हे नाहीत. ‘खोडद (ता. जुन्नर) येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) कामकाजावर या प्रस्तावित रेल्वेमार्गाचा प्रतिकूल परिणाम होत असल्याने त्याला रेल्वे मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या मार्गाचा पुन्हा नव्याने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याचे काम सुरू केले आहे,’ अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत दिली.
‘महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ने (महारेल) पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार केला होता. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो रेल्वे मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता. मात्र, सध्याच्या रेल्वेमार्गाच्या आखणीत (अलाइनमेंट) अडचणी असल्याने हा प्रकल्पच रद्द करण्यात आल्याचे स्पष्टीकरण रेल्वेमंत्री वैष्णव यांनी एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिले.
वैष्णव म्हणाले, ‘पुणे आणि नाशिक शहरे जोडण्यासाठी ‘महारेल’ने डीपीआर तयार केला आहे. त्यातील प्रस्तावित मार्गाजवळच ‘जीएमआरटी’ची भव्य वेधशाळा आहे. जगातील ३१ देशांतील वैज्ञानिक विविध निरीक्षणांसाठी ‘जीएमआरटी’च्या सुविधेचा वापर करतात. प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे त्यांच्या कामकाजात बाधा येणार असल्याने हा मार्ग व्यवहार्य नसल्याचे नव्याने प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’
प्रवाशांना किती वर्षे त्रास ?
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून आहे. त्यामध्ये सतत काही ना काही अडचणी येत आहेत. आता या प्रकल्पाचा पुन्हा नव्याने ‘डीपीआर’ तयार केल्यानंतर काही अडचणी नव्याने उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे-नाशिक वेगवान रेल्वे प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रवाशांना आणखी काही वर्षे तरी वाहतूक कोंडीतून रस्तेमार्गानेच प्रवास करावा लागणार आहे.
तीन रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण होणार
‘पुणे-अहिल्यानगर (१२५ किमी), नाशिक साईनगर शिर्डी (८२ – किमी) दरम्यान नवीन दुहेरी मार्ग आणि साईनगर शिर्डी- पुणतांबा (१७) किमी) दरम्यान नवीन दुहेरी मार्ग अशा तीन रेल्वे प्रकल्पांच्या सर्वेक्षणाला मान्यता देण्यात आली आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर या मार्गांचा ‘डीपीआर’ तयार केला जाणार आहे. पुणे-नाशिक दरम्यान रेल्वे दळणवळण यंत्रणा सुधारण्यासाठी २४८ किलोमीटरच्या दौंड-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १७८ किलोमीटरचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. उर्वरित भागाचे काम हाती घेण्यात आले आहे,’ असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले.