महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ डिसेंबर ।। प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा द्यायची आहे, बसस्थानकेही चकाचक करायची आहेत. त्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे भाडेवाढ क्रमप्राप्त ठरते, त्यानुसार १४.९५ टक्के प्रवासभाडे वाढविण्याचा प्रस्ताव शासनाला दिल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, भरत गोगावले यांनी पत्रकारांना दिली.
एसटी महामंडळाची ३०६वी बैठक बुधवारी ‘वनामती’मध्ये पार पडली. बैठकीत महामंडळाची आर्थिक स्थिती कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. नव्या वर्षात ३५०० बस घेण्याचे ठरले आहे. त्यापैकी २२०० बस जानेवारीपासून ताफ्यात दिसतील. तसेच, भाडेतत्त्वावरील १,३१० बसेस तीन महिन्यांत सेवेत येतील, असे गोगावले यांनी सांगितले.
बसस्थानकांचा होणार कायापालट…
बसचा केवळ लूकच नव्हे, तर बसस्थानकांचाही चेहरामोहरा बदलवायचा आहे. बीओटी तत्त्वावर काही कामे करायची आहेत. त्यामुळेच प्रवासभाडे वाढविण्याचा प्रस्ताव दिल्याचे गोगावले म्हणाले. एसटीच्या कर्मचाऱ्यांचे ३ हजार, ७५ कोटी रुपये महामंडळाकडे थकीत आहेत. ते लवकरच त्यांना परत करण्यासाठी प्रयत्न करू, असेही गोगावले यांनी सांगितले.