महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ डिसेंबर ।। राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या सर्वच भागांत मागील काही दिवसांपासून थंडीने कहर केला आहे. आता मात्र या थंडीच्या लाटेत वाढ झाली असून, किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 1.5 ते 5.3 अंशांनी खाली घसरला आहे.
दरम्यान, बुधवारी विदर्भातील वाशिम येथे सर्वांत कमी म्हणजेच 6.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील चार ते पाच दिवस थंडीची तीव्र लाट कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकणसह मुंबई भागातही थंडी वाढली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवाताची तीव्रता हिमालयीन भागात कायम आहे. त्यामुळे उत्तर भारतातील दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, लडाख, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश या भागांत थंडीची तीव्र लाट पसरली आहे. किमान तापमान सरासरीपेक्षा उणे 1.8 अंशांनी खाली घसरले आहे.
उत्तर भारतातील या स्थितीमुळे या भागाकडून राज्याकडे तीव्र थंड वारे वाहत आहेत. यामुळे राज्यात तीव्र थंडीची लाट आली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचे किमान तापमान सरासरीपेक्षा 1.5 ते 5.3 अंशांनी घसरले आहे. ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार आहे.
राज्यात असे होते बुधवारचे किमान तापमान
मुंबई – 19.5, सांताक्रुझ – 15.4, अलिबाग – 14.9, रत्नागिरी – 17.7,डहाणू – 16, पुणे – 8.9, लोहगाव – 11.8, अहिल्यानगर – 7.4, जळगाव – 8.4, कोल्हापूर – 14.8, महाबळेश्वर -13.5, मालेगाव – 11, नाशिक – 9, सांगली – 11.6, सातारा – 10.1, सोलापूर – 12.4, छत्रपती संभाजीनगर – 11, परभणी -10.1, नांदेड – 7.6, बीड – 9, अकोला – 10.8, अमरावती -11.5, बुलडाणा – 12.5, ब्रह्मपुरी – 20, गोंदिया – 8.8, नागपूर – 9.4, वाशिम – 6.6, वर्धा -10.5