महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ डिसेंबर ।। पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाचा दर्जा वाढून प्रादेशिक परिवहन कार्यालयात रूपांतर झाले. दर्जा वाढल्याने कामाचा विस्तारदेखील झाला सोबतच अधिकारी कर्मचारी संवर्गातील पदेही वाढली. त्यामुळे 121 मंजूर पदांना मान्यता असून केवळ 97 पदांवरच आरटीओचा कारभार सुरू आहे. अद्यापपर्यंत 24 पदे रिक्त असल्याने आरटीओतील अनेक कामांना विलंब होत आहे.
शासनाच्या जुलै 2023 च्या निर्णयानुसार आरटीओचा दर्जा प्राप्त झाल्यानंतरही पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नावाने प्रत्यक्ष कारभार सुरू झाला नव्हता. पूर्वीच्याच उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यास अतिरिक्त पदभार देऊन वर्षभर येथील कार्यभार सोपविण्यात आला.
कार्यालयाचा दर्जा वाढविल्याने पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत जुन्नर, आंबेगाव, पिंपरी-चिंचवड, मावळ असा मोठा परिसर या कार्यालयाच्या अखत्यारित आला आहे. दर्जा वाढल्याने अधिकारी आणि कर्मचार्यांची संख्या वाढणे अपेक्षित होते. पदांना मंजुरी मिळाली मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटूनही पदे भरली नाही. परिणामी कामांना विलंब आणि आताच्या मनुष्यबळावर कामाचा ताण वाढल्याचे दिसून येत आहे.
वाहन परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन मालकीचे हस्तांतरण, वाहन करसंकलन, वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र आदी कामांसाठी नागरिकांना आरटीओमध्ये जावे लागते. तसेच वाहनांवरील खटल्याचे चलन भरण्यासाठी अनेकदा आरटीओची वेबसाईट बंद असल्याने कार्यालयात जावे लागते, मात्र अपुर्या मनुष्यबळामुळे नागरिकांना एका दिवसाच्या कामासाठी दोन ते तीन दिवस वाट बघावी लागते.
पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-बंगळुरू द्रृतगती मार्ग, जुना पुणे-मुंबई महामार्ग यांसह शहरातील वाहनांच्या तपासणीसाठी वायुवेग पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. कागदपत्रे नसलेली बेकायदा वाहन चालविलणार्यांवर कारवाईची जबाबदारी मोटार वाहन निरीक्षकांची असते. मात्र, पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये निरीक्षकांची संख्या अपुरी असल्याने शहरातील अशा वाहनांवरील कारवाई संथगतीने होत आहे.
दोन उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांपैकी एकच नियुक्तीस:
प्रादेशिक परिवहन विभागाचा दर्जा मिळाल्यावर दोन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या कार्यालयास मिळणार होते; मात्र प्रत्यक्षात एकच अधिकारी कार्यरत आहे. तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्यांच्या संख्येतही वाढ होणार असून, चार पदे मंजूर आहेत; परंतु आता केवळ दोनच अधिकारी कार्यरत आहेत.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभाग झाल्याने विस्तार झाला असून, कामाचा व्याप वाढला आहे. कर्मचारी संख्या कमी असली तरीदेखील नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडविले जात आहेत. उपलब्ध कर्मचार्यांकडून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे.