Mumbai–Bengaluru Industrial Corridor : ‘बूस्टर डोस’ मिळाला; कोल्हापूर ठरणार विकासाचा नवा केंद्रबिंदू

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २० फेब्रुवारी २०२६ | कोल्हापूर : मुंबई आणि बंगळूर या दोन आर्थिक महासत्तांना जोडणाऱ्या सुमारे १,००० किमी लांबीच्या औद्योगिक महामार्गाला यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव चालना मिळाली आहे. या कॉरिडॉरमधील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मोठ्या निधीची तरतूद जाहीर झाल्याने कोल्हापूरसाठी विकासाची नवी दारे खुली होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रातील सातारा आणि कर्नाटकातील धारवाड हे दोन प्रमुख ‘नोड्स’ वेगाने विकसित होत असताना, त्यांच्या मध्यभागी असलेले कोल्हापूर ‘इन्फ्ल्युएन्स झोन’ म्हणून पुढे येत आहे. उद्योग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात यांचा केंद्रबिंदू म्हणून कोल्हापूरची ओळख अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र आहे.

साताऱ्यासाठी ८२४ कोटींची तरतूद करण्यात आली असून, धारवाडसाठी ५३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीवरील ९१३.७ कोटी रुपयांचा सहापदरी उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. सुमारे ३.५ किमी लांबीचा हा पूल महापुराच्या काळातही वाहतूक अखंड ठेवणार आहे. याशिवाय कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गासाठी ३,२४४ कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्यामुळे कोल्हापूर थेट कोकण रेल्वे आणि बंदरांशी जोडले जाणार आहे. निर्यातक्षम उद्योगांसाठी हा मार्ग जीवनदायिनी ठरणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ आणि दाभोळ गॅस पाइपलाइन परिसरात हा कॉरिडॉर विस्तारत असल्याने औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल.

दरम्यान, धारवाडमध्ये जपानी कंपनी ‘निटेक’ने ५० एकरवरील ‘ऑर्चर्ड हब’ प्रकल्पातून उत्पादनास सुरुवात केली आहे. डेटा सेंटर्ससाठी जनरेटर्स, इलेक्ट्रिक वाहनांच्या मोटर्स आणि नवीकरणीय ऊर्जा उपकरणांची निर्मिती येथे सुरू असून निर्यातही होत आहे. संपूर्ण कॉरिडॉरमधून सुमारे २५ लाख रोजगारनिर्मितीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. २०१३-१४ मध्ये मांडलेली संकल्पना आता प्रत्यक्षात उतरत असून, २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे प्रकल्पाला ‘बूस्टर डोस’ मिळाला आहे. उद्योगांच्या नकाशावर कोल्हापूर ठळकपणे झळकण्याची हीच वेळ असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *