महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ डिसेंबर ।। टीम इंडियाचा स्टार खेळाडू आर. अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरा सामना अनिर्णित ठरल्यावर काही वेळातच भारतीय चाहत्यांना धक्का बसला. प्लेइंग ११ मध्ये नसलेल्या अश्विनने तडकाफडकी निवृत्तीचा घेतलेला निर्णय चाहत्यांना पचला नाही. अचानक असं काय झालं त्याने थेट निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. चाहतेच नाहीतर आजी-माजी खेळाडूंनाही अश्विनने आताच निवृत्ती घ्यावी असं वाटलं नाही. अशातच टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू अनिल कुंबळेने अश्विनच्या निवृत्तीवर आपली प्रतिक्रिया देताना खंत बोलून दाखवली.
अनिल कुंबळे यांच्यानंतर भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा अश्विन हा दुसरा खेळाडू आहे. त्यासोबतच पठ्ठ्याने कसोटीमध्ये ६ शतके आणि १४ अर्धशतके केली आहेत. अश्विनच्या या निर्णयाने ते निराश असून त्यांची इच्छा होती की सर्वाधिक विकेटचा रेकॉर्ड अश्विनने आपल्या नावावर करायला हवा. अश्विने आपल्या १४ वर्षांच्या मोठ्या करियरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मात्र त्याने नेहमी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कमबॅक केलं होतं.
अनिल कुंबळे काय म्हणाले?
शानदार करियरसाठी अभिनंदन, अॅश टीम इंडियाचा तू चॅम्पियन गोलंदाज आहेस. तुझी आठवण येईल आणि टीमला तुझी कमी नक्की जाणवेल. तु घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे मी निराश झालो आहे. मी तुला ६१९ च्या पलीडकडे जाताना पाहायंच होतं.(सर्वाधिक कसोटी विकेट) पण या निर्णयामागे तुझं काही कारण असावं. दुसऱ्या इनिंगसाठी तुला भरभरून शुभेच्छा, मला खात्रा आहे की पहिल्या इनिंगसारखाच तोसुद्धा अप्रतिम असेल. पुन्हा एकदा तुला शुभेच्छा आणि लवकरच भेटू, असं अनिल कुंबळे यांनी म्हटलं आहे.