Chhagan Bhujbal: या कारणांमुळे छगन भुजबळ मंत्रिपदापासून दूर का ? समोर आली हि कारणं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ डिसेंबर ।। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डावलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. भुजबळांना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यासाठी आंदोलनं देखील करण्यात आली. छगन भुजबळ अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची देखील चर्चा होत आहे.

बुधवारी छगन भुजबळ यांनी अजित पवार यांनीच आपल्याला मंत्रिमंडळातून वगळले असल्याचे म्हणत टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे देखील अजित पवार यांनी ऐकले नाही. त्यामुळे दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही, असा हल्लाबोल छगन भुजबळांनी केला. अशामध्ये छगन भुजबळ यांना मंत्री पदापासून दूर ठेवण्यामागची काही कारणं समोर आली आहेत.

छगन भुजबळ यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्यामुळे पक्षातील नेते आणि पदाधिकारी भुजबळ यांच्यावर नाराज होते. छगन भुजबळ यांनी बळजबरीने मुलासाठी म्हणजेच पंकज भुजबळसाठी विधानपरिषद आमदारकी पदरात पाडून घेतली. ती पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आवडली नाही. समीर भुजबळ यांनी पक्षाविरूद्ध जाऊन अपक्ष उमेदवारी भरल्याने मित्रपक्ष नाराज झालेत.

नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊ नका अशी अजित पवार यांच्याकडे विनंती केली होती. जर मंत्रिपद दिलं तर नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार एकत्रित राजीनामा देऊ, असंही म्हटलं आहे. या सर्व कारणांमुळे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात न घेतल्याचे बोलले जात आहे.

छगन भुजबळ यांनी बुधवारी नाराजी व्यक्त करताना सांगितले की, ‘मला जर राज्यसभेवर पाठवायचं होतं. तर येवल्यातून उभं करायचंच नव्हतं. माझा मंत्रिमंडळात समावेश असावा असा आग्रह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांनी केला होता. पण अजित पवारांनी कोणाचेही ऐकले नाही आणि मला मंत्रिमंडळातून वगळले. त्यामुळे कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही.निर्णय प्रक्रियेमध्ये विश्वासात न घेता घरकी मुर्गी दाल बराबर अशी माझी अवस्था झाली आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *