महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२१ डिसेंबर ।। हवेतील वाढत्या सूक्ष्म धुलिकणांमुळे शहरातील प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, दमा, अॅलर्जी, वारंवार शिंका येणे, डोळ्यांची जळजळ होणे, सर्दी, खोकला, सायनस आदी आजारांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात सरासरी 15 ते 30 टक्के रुग्णवाढ झाली असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली.
प्रादेशिक हवामान केंद्र आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत निगडी आणि भोसरी येथे हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा बसविलेली आहे. त्या माध्यमातून सभोवतालच्या हवेतील सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सूक्ष्म धूलिकण, अतिसूक्ष्म धूलिकण आदी घटकांचे परीक्षण केले जाते.
तसेच, शहरात विविध ठिकाणी वायू प्रदूषणाच्या चाचण्या केल्या जात आहेत. ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत निश्चित मानांकनापेक्षा सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते. हीच स्थिती दरवर्षी या पाच महिन्यांमध्ये पाहण्यास मिळते.
खासगी बांधकामांमुळे फटका
शहरामध्ये ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण निश्चित मर्यादेपेक्षा अधिक वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये सुरू असलेली खासगी बांधकामे, मेट्रोची कामे आणि दळणवळण आदी बाबी त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.
काय काळजी घ्याल?
उघड्यावर कचरा जाळू नका.
तोंडाला मास्क वापरा.
स्वच्छ धुतलेला रुमाल वापरा.
भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेट रहा.
थंड पेय, तळलेले, मसालेदार पदार्थ टाळावेत.
सकस आहार आणि चांगली झोप गरजेची