Chhagan Bhujbal | भुजबळ तुतारी फुंकणार की, ओबीसींचा स्वतंत्र पक्ष स्थापणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ डिसेंबर ।। महायुती मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळू न शकल्यामुळे नाराज असलेल्या भुजबळांनी ओबीसी एल्गार पुकारण्याची घोषणा केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख अजित पवार यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे भुजबळ समर्थकांचा संताप अधिकच वाढला आहे.

छगन भुजबळ यांच्या समोरील तीन पर्यायांची चर्चा आता सुरू झाली आहे. खा. नीलेश लंके यांच्या सूचक विधानानंतर भुजबळ अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाऊ शकतात. ते भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रिपद घेऊ शकतात अथवा ओबीसींचे स्वतंत्र संघटन उभारून स्वत:ची ताकद दाखवून देऊ शकतात. यापैकी कुठल्या पर्यायाचा अवलंब भुजबळ करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुती मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना डावलण्यात आल्याने भुजबळ समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. नाराज झालेले भुजबळ हिवाळी अधिवेशन सोडून तडक नागपूरहून नाशिकमध्ये दाखल झाले होते. येथे राज्यभरातील समर्थकांचा मेळावा घेतल्यानंतर त्यांनी ओबीसी एल्गार पुकारत ताकद दाखवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. लाडक्या बहिणींबरोबरच ओबीसींच्या विविध घटकांमुळेच राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्याचा दावा करत अजूनही निवडणुका संपलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप बाकी असल्याची आठवण करून देत भुजबळ यांनी अप्रत्यक्षरीत्या महायुतीला इशाराच दिला. मात्र भुजबळांच्या या इशार्‍यांना अजित पवार यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे भुजबळ समर्थकांमधील अस्वस्थता अधिकच वाढली आहे. महायुतीकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी याआधी प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले राज्यमंत्रिपद घ्या अशी विचारणा भुजबळांना झाली. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार भुजबळांनी ही ऑफर नाकारल्याचे समजते आहे. राज्यमंत्रिपदाऐवजी सन्मानपूर्वक कॅबिनेट मंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवल्यास भुजबळ तो स्वीकारू शकतात, असेही बोलले जात आहे. त्यासाठी भुजबळांना आपल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठविणे व कॅबिनेट मंत्रिपद देणे योग्य ठरेल का यावर भाजपश्रेष्ठींची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच खा. नीलेश लंके यांनी भुजबळांविषयी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भुजबळांवर त्यांच्या पक्षाने अन्याय केल्याची भावना व्यक्त करत भुजबळ शरद पवार गटात आले, तर त्यांचे स्वागतच केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे भुजबळ परत शरद पवारांच्या पक्षात जाणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

भुजबळांसमोर भाजप प्रवेशाचा दुसरा पर्याय आहे. ओबीसींचा चेहरा म्हणून भुजबळांसारखा नेता भाजपला हवा आहे, तर तिसरा पर्याय म्हणजे स्वतंत्र ओबीसी संघटन उभारून राज्यातच नव्हे, तर देशभरात ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न भुजबळ करू शकतात. किंबहुना समर्थकांच्या मेळाव्यात त्यांनी तसे सूतोवाचही केले आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईत समर्थकांशी चर्चा केल्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीबरोबरच भाजप नेतेही संपर्कात
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील पुन्हा मैदानात उतरले असून, उपोषणाची तारीख ठरली आहे. ते दि. 25 जानेवारीपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना जरांगे यांचे उपोषण महायुतीला परवडणारे नाही. अशात ओबीसी नेते भुजबळ यांनी वेगळी भूमिका घेतल्यास महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मोठा फटका सहन करावा लागू शकतो. त्यामुळे भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी आता महायुतीचे नेते सरसावले आहेत. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे व गिरीश महाजन हे भुजबळांच्या संपर्कात असून, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हेही समीर भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या संपर्कात असून चर्चा करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *