महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ डिसेंबर ।। कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरू झाली आहे. कांद्याचे सरासरी दर प्रतिक्विंटल १ हजार ते १ हजार १०० पर्यंत खाली घसरले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणे आता कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड केली आहे. शेतकर्यांना नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून लाल कांद्याकडे शेतकर्यांचा कल वाढलेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात अनेक शेतकऱ्याचा कांदा शेतात खराब झाला होता. यामुळे आवक कमी असल्याने सुरवातीला कांद्याला चांगला दर मिळाला होता. मात्र मागील काही दिवसांपासून दरात घसरण होण्यास सुरवात झाली आहे.
गेल्या आठवड्यापासून कांद्याचे दर कमी होत आहेत. त्यामुळे कांद्यासाठी झालेला खर्च सुद्धा विक्रीतून मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. किरकोळ बाजारात देखील भाव घसरल्याने शेतकरी नाईलाजास्तव कांदा विक्री करत आहे. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
धुक्यामुळे तुरीच्या पिकावर मोठा परिणाम
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा रब्बी हंगाम चिंतेचा ठरत आहे. ढगाळ हवामान आणि धुक्यामुळे तुरीच्या पिकावर मोठा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी तुरीची काढणी सुरू आहे. पण अपेक्षेप्रमाणे उत्पादन होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तुरीचे उत्पादन प्रति एकरी फक्त ८० ते ९० किलोपर्यंत मर्यादित राहिले आहे. ज्यामुळे लागवड खर्चसुद्धा भरून निघत नाही. तुरीच्या फुलोऱ्यावर थंडी आणि धुक्याचा फटका बसल्याने उत्पादनात घट झाली आहे.