महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२३ डिसेंबर ।। नव्या वर्षात अनेक क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा होणार आहेत. यातील एक स्पर्धा म्हणजे चॅम्पियन ट्रॉफी. फेब्रुवारी महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. दरम्यान यावेळी भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना कुठे खेळवला जाणार आहे, हे स्पष्ट झालं आहे. भारत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सामने यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि यूएईचे वरिष्ठ मंत्री शेख नह्यान अल मुबारक यांच्यात पाकिस्तानात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानंतर 23 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार असल्याची माहिती आहे. भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तानशिवाय बांगलादेश आणि न्यूझीलंडचाही समावेश आहे. भारताचा सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेश आणि 2 मार्चला न्यूझीलंडशी होणार आहे. हे सर्व सामने दुबईत होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणार पहिला सामना
पाकिस्तान 19 फेब्रुवारीला कराचीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळून स्पर्धेची सुरुवात करणार आहे. बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानचा शेवटचा साखळी सामना २७ फेब्रुवारीला रावळपिंडीमध्ये खेळवला जाणार आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. भारताव्यतिरिक्त दोन्ही टीमचे सामने लाहोर, कराची आणि रावळपिंडीमध्ये होणार आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालात हा दावा करण्यात आलाय.
फायनलसाठी ठेवलाय रिझर्व डे
दोन्ही उपांत्य फेरीचे सामने ४ मार्च आणि ५ मार्च रोजी होणार आहेत. 9 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. भारताने सेमीफायनल गाठली तर पहिला उपांत्य सामना यूएईमध्ये खेळवला जाणार आहे. जर भारत पात्र ठरला नाही तर हा सामना पाकिस्तानमध्ये खेळवला जाणार आहे.
या स्पर्धेची फायनल लाहोरमध्ये होणार आहे, पण जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर तो यूएईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
पाकिस्तानची टीमही भारतात येणार नाही
सर्व संबंधित पक्षांमध्ये झालेल्या करारानंतर हे हायब्रीड मॉडेल ठरवण्यात आलंय. या करारानुसार, 2027 पर्यंत भारताने आयोजित केलेल्या ICC स्पर्धांमध्ये पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहे. सेमीफायनल आणि फायनल सारखे नॉकआउट गेम देखील तटस्थ ठिकाणी आयोजित केले जातील. हा करार चॅम्पियन्स ट्रॉफीपासून सुरू होणार आहे.