महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२३ डिसेंबर ।। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील तरकारी विभागात मागील आठवड्याच्या तुलनेत परराज्यासह राज्याच्या विविध भागांतून, परराज्यांतून होणारी फळभाज्यांची आवक वाढली आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्यामुळे शेवगा आणि कांद्याचे वाढलेले भाव कमी झाले आहेत. याबरोबरच बटाटा आणि मटारच्या भावातही घसरण झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
बाजारात रविवारी (दि. 22) 90 ते 100 ट्रक शेतीमालाची आवक झाली. परराज्यातून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात आणि आंध्रप्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 10 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 5 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा आणि पावटा प्रत्येकी 3 टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा 5 टेम्पो, राजस्थान येथून 10 ट्रक गाजर, कर्नाटक येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, मध्यप्रदेश येथून सुमारे 20 ट्रक मटार, तामिळनाडू येथून 1 टेम्पो तोतापूरी कैरी, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 10 टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 600 गोणी, भेंडी 7 तर गवार, काकडी, कोबी आणि हिरवी मिरची प्रत्येकी 5 टेम्पो, टोमॅटो 10 हजार पेटी, फ्लॉवर, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी 10 टेम्पो, कांदा सुमारे 100 ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 40 टेम्पो आवक झाल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
पालेभाज्यांना मागणी नाही
मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक स्थिर आहे. मात्र, पालेभाज्यांना अपेक्षित उठाव नाही. त्यामुळे घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे 2 रुपये, शेपू, चाकवत, अंबाडी आणि चवळईच्या भावात जुडीमागे प्रत्येकी 1 रुपयांनी घट झाली आहे. तर केवळ कांदापातच्या भावात जुडीमागे 2 रुपयांनी वाढ झाली आहे.
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. येथील बाजारात रविवारी (दि. 22) कोथिंबिरीची दीड लाख जुडी, तर मेथी आणि हरभर्याची अनुक्रमे 70 हजार आणि 10 हजार जुडी आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली.