अजितदादांकडून तुमची फसवणूक झाली का? छगन भुजबळांचे सूचक उत्तर; शरद पवारांचे केले कौतुक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२३ डिसेंबर ।। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ फारच नाराज झाले आहेत. मंत्रिमंडळाच्या शर्यतीतून आपले नाव बाद झाल्याचे लक्षात येताच छगन भुजबळ यांनी तातडीने सभा, बैठका घेऊन दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. तर, पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर टीका करताना दुसरीकडे शरद पवार यांचे कौतुक केले आहे.

मंत्रिमंडळात काही मान्यवरांना थांबायला सांगितले, तर काहींनी रोष व्यक्त केला. वास्तविक कधी कधी नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते. इथे संधी न देता केंद्रात संधी देण्याचा आपण विचार केलेला आहे. त्यांना योग्य मानसन्मान दिला पाहिजे, तो देण्यासाठी अजित पवार तसूभर कमी पडणार नाही. पण याबाबत गैरसमज करुन वेगळी भूमिका घेणे बरोबर नाही. राज्यात कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. यावर छगन भुजबळ यांनी पलटवार केला. ते पत्रकारांशी बोलत होते.

अजितदादांकडून तुमची फसवणूक झाली का?

नवीन लोकांना संधी देणे चांगली गोष्ट आहे, पण हे ठरवले पाहिजे किती वर्ष तरुण म्हणायचे? मी अगोदरच म्हणालो होतो, मला लोकसभेत पाठवा तिथे थांबावे लागले, राज्यसभेत थांबावे लागले, तेव्हा म्हणाले की, राज्यात गरज आहे. आता म्हणतात राज्यसभेत जा… म्हणजे विधासभेत राजीनामा द्यावा, हे कसे शक्य आहे? अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली. अजित पवारांकडून तुमची फसवणूक झाली का? असा प्रश्न यावेळी भुजबळ यांना विचारण्यात आला. यावर, मला माहिती नाही, तुम्हाला काय निष्कर्ष काय काढायचा तो काढा, असे भुजबळ म्हणाले.

दरम्यान, माझ्या एवढे तुम्ही पण जुने आहात ना. मंत्री म्हणून तुम्ही एवढे जुने आहात. तुमचे काय वय आहे? प्रश्न वयाचा नाही. ओबीसींसाठी आम्ही आवाज उचलला. नव्या लोकांना द्यायचे असेल तर मला उभे करायचे नव्हते. आमच्यापेक्षा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अधिक निवडून आले. परभणी आणि बीडमध्ये तुमच्या आधी तर शरद पवार तिथे पोहोचले, असे सांगत भुजबळ यांनी कौतुकोद्गार काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *