महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ डिसेंबर ।। मुंबईहुन गोव्याला जाणारी वंदे भारत रेल्वे वाटेतच आपला मार्ग चुकली. त्यामुळे गोव्यातील मडगावला जाणारी वंदे भारत रेल्वे भलत्याच मार्गावर गेल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) ते मडगावपर्यंत धावणारी देशातील आधुनिक ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस ठाणे जिल्ह्यात आपला मार्ग चुकली. दिवा स्थानकातून ही गाडी पनवेलकडे जाण्याऐवजी कल्याणच्या दिशेने वळली. यानंतर रेल्वेअधिकाऱ्यांची गोंधळ उडाला.
घाईघाईने ही रेल्वे कल्याण स्टेशनवर नेण्यात आल्याचं सांगितलं जातंय. कल्याणला पोहोचल्यानंतर तेथून काही वेळाने ही रेल्वे पुन्हा दिवा स्थानकात परतली आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू केला. परंतु या सर्व गोंधळामुळे ट्रेन ९० मिनिटे उशिराने पोहोचली. याबाबतचं वृत्त अमर उजाला या वृतसंस्थेने दिले आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी दिवा-पनवेल मार्गावर जाणार होती, जो कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी नियोजित मार्ग आहे. मात्र ही गाडी सकाळी ६.१० वाजता दिवा स्थानकाच्या पुढे कल्याणच्या दिशेने वळली. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिग्नलमधील त्रुटीमुळे हा गोंधळ उडाला. दिवा जंक्शन येथे डाउन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन दरम्यान पॉइंट क्रमांक १०३ वर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.
दिवा स्टेशनवर वंदे भारत रेल्वे थांबली ३५ मिनिटे
वंदे भारत रेल्वे कल्याणकडे गेली त्यानंतर परत दिवा स्टेशनवर आली. या गोंधळानंतर मध्य रेल्वेच्या मुंबई लोकल ट्रेन सेवेवर मोठा परिणाम झाला. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अनियमितता समोर आल्यानंतर ही गाडी कल्याण स्थानकात नेण्यात आली आणि काही वेळानंतर ही गाडी दिव्याला परत पाठवण्यात आली. दिवा येथे पोहोचल्यानंतर ही गाडी दिवा-पनवेल या निश्चित मार्गाने मडगावकडे रवाना झाली.
मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवा जंक्शनवर सकाळी ६.१० ते ७.४५ या वेळेत सुमारे ३५ मिनिटे ट्रेन थांबवण्यात आली होती. ही रेल्वे पाचव्या मार्गाने कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर ७.०४ वाजता पोहोचली. त्यानंतर ही रेल्वे सहाव्या मार्गाने ७.१३ वाजता पुन्हा दिवा स्थानकात आणण्यात आली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीएसएमटी-मडगाव या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन जून २०२३ मध्ये सुरू करण्यात आली होती.
नियोजित वेळापत्रकानुसार ही ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून पहाटे ५.२५ वाजता सुटते आणि त्याच दिवशी दुपारी १.१० वाजता गोव्यातील मडगावला पोहोचते.