महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ डिसेंबर ।। भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत.
ही मालिका सध्या १-१ ने बरोबरीत असून चौथा कसोटी सामना हा दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रेविस हेड सराव करण्यासाठी मैदानात आलेला नाही. त्यामुळे हेड या कसोटीत खेळणार की नाही, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
ब्रिस्बेन कसोटीतील पहिल्या डावात हेडने शानदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात तो अडचणीत असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे पाचव्या दिवशी तो मैदानावर उतरला नव्हता.
आता चौथ्या कसोटीपूर्वी झालेल्या सराव सत्रासाठीही तो मैदानात उतरलेला नाही. सामन्यानंतर त्याला आपल्या दुखापतीबाबत प्रश्न विचारला असता, तो म्हणाला होता की, थोडीशी कणकणी आहे पण चौथ्या कसोटीपूर्वी तो पूर्णपणे फिट होईल.
सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, हेडला पुन्हा एकदा आपली फिटनेस सिद्ध करावी लागणार आहे. या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या हेड कोचने सांगितलं आहे की, ट्रेविस हेड बॉक्सिंग डे कसोटी खेळणार.
बॉर्डर- गावसकर मालिकेत हेडची तुफान फटकेबाजी
बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत ट्रेविस हेडची बॅट चांगलीच तळपली आहे. या मालिकेत फलंदाजी करताना तो भारतीय गोलंदाजांवर चांगलाच भारी पडला आहे. आतापर्यंत मालिकेतील ३ सामन्यांम्ये त्याने दमदार फलंदाजी केली आहे. त्याने ८१.२ च्या सरासरीने ४०९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतक आणि १ अर्धशतक झळकावलं आहे.
यादरम्यान १५२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. हेडला विश्रांती मिळणं ही भारतीय संघासाठी समाधानकारक बाब आहे.कारण संपूर्ण मालिकेत हेड भारतीय गोलंदाजांना नडला आहे. चौथ्या कसोटीत जर तो संघात नसेल, तर ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान होऊ शकतं. कारण गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये त्याने मध्यक्रमात फलंदाजी करताना संघाचा डाव सांभाळला आहे.