महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ डिसेंबर ।। कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
या भागातील शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
मुंबईतील कमाल तापमानात घट
दुसरीकडे, पश्चिमी प्रकोपाच्या प्रभावामुळे मुंबईतील कमाल तापमानात घट झाली आहे. यामुळे दिवसभर वातावरणात गारवा जाणवत आहे. केवळ मुंबईतच नाही, तर महाराष्ट्रातही हा परिणाम जाणवत असून राज्यात बोचऱ्या वाऱ्यांची शक्यताही वर्तवली गेली आहे. पश्चिमी प्रकोपाच्या प्रभावामुळे बुधवार आणि गुरुवारी पुन्हा ढगाळ वातावरण वाढण्याचा अंदाज आहे.
गारपीट, पाऊस आणि मग पुन्हा थंडी
या आठवड्यात गारपीट, पाऊस आणि मग पुन्हा थंडी असा अनुभव राज्यभरात येण्याचा अंदाज निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. २४ डिसेंबरला काही प्रमाणात बोचरे वारेही अनुभवायला मिळू शकतात. त्यानंतर २५ आणि २६ डिसेंबरला थंडी कमी होऊन राज्यभरात ऊबदारपणा जाणवेल, तर गुरुवार ते शनिवार म्हणजेच २६ ते २८ डिसेंबरच्या दरम्यान तीन दिवसांत ढगाळ वातावरण राहील, तर तुरळक ठिकाणी गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.
कोणकोणत्या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज?
विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मालेगाव, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, परभणी जिल्हे आणि लगतच्या परिसरात पावसाची शक्यता अधिक आहे.