महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ डिसेंबर ।। चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पुढील वर्षी होणार आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली जाईल. पाकिस्तानशिवाय या स्पर्धेचे आयोजन संयुक्त अरब अमिराती (ICC) करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी आगामी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून अंतिम सामना 9 मार्चला खेळला जाणार आहे.
पात्र ठरल्यास भारत दुबईत अंतिम सामना खेळेल
आठ संघांच्या या स्पर्धेत 15 सामने होणार आहेत. भारतीय संघाचे ग्रुप स्टेजचे सर्व सामने दुबईत खेळवले जातील. तर, इतर संघांचे सामने पाकिस्तानातच खेळवले जातील. ही स्पर्धा 19 दिवस चालणार आहे. पाकिस्तानातील रावळपिंडी, लाहोर आणि कराची येथील मैदानांवर हे सामने खेळवण्यात येणार आहेत. पाकिस्तानमध्ये प्रत्येक मैदानावर तीन गट सामने खेळवले जातील. दुसऱ्या उपांत्य फेरीचे आयोजन लाहोरमध्ये होईल. जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही, तर लाहोर येथील मैदानावर 9 मार्च रोजी अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येईल. भारत पात्र ठरल्यास अंतिम सामना दुबईत खेळवला जाईल. सेमीफायनल आणि फायनल या दोन्ही सामन्यांमध्ये राखीव दिवस असतील. तीन गट सामने आणि भारताचा समावेश असलेला पहिला उपांत्य सामना दुबईत खेळवला जाईल.
19 फेब्रुवारीपासून सुरू होणार
गतविजेता पाकिस्तान 19 फेब्रुवारीला कराची येथे न्यूझीलंडविरुद्ध स्पर्धेची सुरुवात करेल. पाकिस्तानचा शेवटचा साखळी सामना बांगलादेश विरुद्ध रावळपिंडी येथे 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी सामना 23 फेब्रुवारी (रविवार) रोजी खेळला जाणार आहे.
Check out the full fixtures for the ICC Champions Trophy 2025. pic.twitter.com/oecuikydca
— ICC (@ICC) December 24, 2024
भारत, पाकिस्तान बांगलादेश, न्यूझीलंड अ गटात
टीम इंडिया अ गटात आहे. या व्यतिरिक्त या गटात पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचे संघ आहेत. भारतीय संघाची पहिली लढत 20 फेब्रुवारीला बांगलादेशशी होईल. त्यानंतर 23 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि 2 मार्चला न्यूझीलंडशी सामना रंगेल. हे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत.
ब गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि द. आफ्रिका
ब गटात गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि द. आफ्रिका या संघांचा समावेश आहे. टीम इंडिया व्यतिरिक्त दोन्ही गटातील सर्व संघांचे सामने लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे होतील.
उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी काय व्यवस्था आहे?
दोन उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 मार्च रोजी होतील. दोन्ही उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 9 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठीही राखीव दिवसाची तरतूद आहे. भारत जर पहिला उपांत्य फेरीत पोहोचला तर हा सामना दुबई येथे खेळवला जाईल. जर भारत पात्र ठरला नाही तर हा सामना पाकिस्तानमध्येच होईल. त्याचप्रमाणे अंतिम सामना लाहोरमध्ये खेळवण्यात येणार आहे. पण जर भारताने विजेतेपदापर्यंत मजल मारल्यास ही लढत युएईमध्ये होणार आहे.