महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ डिसेंबर ।। नाताळनिमित्त लष्कर भागात होणारी गर्दी विचारात घेऊन या भागातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारी (ता.२५) बदल करण्यात आले आहेत. गर्दी वाढल्यानंतर महात्मा गांधी रस्ता (एम. जी. रोड) वाहतुकीस बंद करण्यात येणार असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
नाताळनिमित्त लष्कर भागात मोठी गर्दी होत असते. त्यामुळे गर्दीच्या वेळी या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
वाहतूकीतील बदल बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासून सुरू होतील तर गर्दी ओसरेपर्यंत ते असणार आहेत. वाय जंक्शन येथून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करण्यात येणार असून, या भागातील वाहतूक कुरेशी मशीद, सुजाता मस्तानी चौकातून वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून अरोरा टॉवर्सकडे येणारी वाहतूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून तीन तोफा चौकाकडे सोडण्यात येणार आहे.
व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, या भागातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे.
इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून वाहतूक लष्कर पोलिस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, या भागातील वाहने ताबूत स्ट्रीटमार्गे जातील, असे वाहतूक शाखेकडून कळविण्यात आले आहे.