महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२६ डिसेंबर ।। मेलबर्नमधील ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यासाठी दोन्ही संघात प्रत्येकी एक बदल करण्यात आला. ऑस्ट्रेलियाने जोश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलंडला आणि भारताने शुभमन गिलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली.
कांगारुकडून सलामी करताना 19 वर्षीय नवोदित सॅम कॉन्स्टासने उस्मान ख्वाजासोबत पहिल्या विकेटसाठी 89 धावांची तुफानी भागीदारी करत कांगारूंना चांगली सुरुवात करुन दिली. कॉन्स्टासने पदार्पणाच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करत बुमराहला लक्ष्य केले. त्याने केवळ 53 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. मात्र, यानंतर तो रवींद्र जडेजाच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. 65 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 60 धावा करून कॉन्स्टास बाद झाला.
यानंतर ख्वाजाने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. ख्वाजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 27 वे अर्धशतक झळकावले.121 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 57 धावा करून तो बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचवेळी बुमराहने हेडला खाते उघडू शकले नाही. त्याला बुमराहने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर बुमराहने मिचेल मार्शला स्वस्तात बाद केले. त्याला चार धावा करता आल्या.
यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत लाबुशेनने 145 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 72 धावांची खेळी केली. कसोटी कारकिर्दीतील हे 22 वे अर्धशतक होते. लाबुशेच्या विकेटनंतर स्मिथने आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे. त्याने 111 चेंडूत 68 धावांच्या नाबाद खेळीत पाच चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याला साथ देत आता कर्णधार पॅट कमिन्स 11 धावांवर खेळत आहे. भारताकडून गोलंदाजी करताना बुमराहने तीन विकेट घेतल्या आहेत. तर आकाश दीप, जडेजा आणि सुंदर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.