कोकणात पर्यटकांची त्सुनामी ; सहा लाख पर्यटक दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२६ डिसेंबर ।। नाताळ आणि इंग्रजी नववर्ष स्वागतासाठी पर्यटनस्थळी जाण्याचा ट्रेन्ड गेल्या किमान दहा ते पंधरावर्षांपासून वाढला आहे. बुधवारी नाताळच्या दिवशी कोकणच्या किनारपट्टीत सहा लाख पर्यटक दाखल झाले असून, यांतील सर्वाधिक पर्यटक रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात आले असल्याची माहिती कोकणच्या पर्यटनाचे अभ्यासक तथा कोकण पर्यटक व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे. परिणामी कोकणच्या सागरी किनारपट्टीत पर्यटकांची त्सुनामीच आल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, गोवा येथे आलेले पर्यटक सिंधुदूर्ग जिल्ह्यातील स्कूबाडायव्हींग, वॉटरस्पोर्टस आणि सिंधुदुर्ग किल्ला पहाण्याकरिता दररोज सकाळी येऊन सध्याकाळी परत गोवा मुक्कामी जात आहेत. या पर्यटकांची संख्या 20 ते 22 हजाराच्या घरात असल्याचेही मोंडकर यांनी सांगीतले. गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सिंधूदुर्ग जिल्ह्यातील टप्प्याचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे तर रत्नागिरी जिह्यातही ते आता बर्‍यापैकी पूर्ण झाले आहे.

परिणामी पश्चिम महाराष्ट्रातून कोल्हापूर,सातारा,सांगली आदि जिल्ह्यातून येणार्‍या पर्यटकांचे प्रमाण मोठे आहे. रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून झालेली दुरवस्था यामुळे गोव्याला जाण्या ऐवजी कोकणच्या सागरी किनारपट्टीतील निसर्ग रमणीय आणि शांत गावांमध्ये पर्यटनासाठी जाण्याच्या पर्यायास राज्य परराज्यातील पर्यटकांनी पसंती दर्शवली असल्याने कोकणात नाताळ व नववर्ष स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांची ही विक्रमी संख्या अनूभवास येत आहे. मांडवा, किहिम ,थळ, वरसोली, अलिबाग, आक्षी-नागाव, रेवदंडा, काशिद, नांदगांव, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन हे किनारे पर्यटकांनी बहरले आहेत. येथे आलेले पर्यटक किनारयांवर फिरून झाल्यावर पाण्यात मनसोक्त डुंबत आहेत. एटीव्ही राईड बरोबरच वेगवेगळया वॉटरस्पोर्टसचा मनमुराद आनंद घेत आहेत. त्यात बनाना राईटस, जेट स्की, पॅरासेलींग, उंटसफारी, घोडेस्वारी यांचा समावेश आहे.उंट सवारी घोडागाडी यामुळे बच्चे मंडळी खुश आहेत.नाताळच्या सुट्ट्यामुळे अलिबाग मधील मांडवा, आवास, सासवणे, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौल आणि रेवदंडा येथे साधारणपणे 50 हजार पर्यटक दाखल झाले आहेत तर मुरुड तालुक्यातील काशिद, नांदगाव, मुरुड आणि फणसाड येथे 20 हजारहून अधिक पर्यटक दाखल झाले आहेत. बोटींग व्यवसायिक, स्टॉलधारक, नारळपाणी विक्रेते यांचे व्यवसाय तेजीत असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात सहकुटूंब पर्यटनास जाण्याची मानसीकता वाढल्याचे दिसून आल्यावर हा निर्णय त्यांनी घेतला आहे. माऊथ पब्लिसिटीतून कुटूंबवत्सल पर्यटक नातळा वा नव वर्ष स्वागतच नव्हे तर वर्षभरातील सुट्ट्या आणि शनिवार रविवारी सातत्याने पर्यटक कुंटूंबे येथे येत असतात अशी माहिती किहीम येथील कॉटेज व्यावसांयिक अरुण दातार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *