Raj Thackeray : ”मनमोहन सिंगच भारताच्या सध्याच्या काळाचे खरे शिल्पकार”; राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२७ डिसेंबर ।। माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले आहे. काल दिल्लीतील एक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाले राज ठाकरे?
”१९९१ ला जेंव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेंव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशावेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंहरावांसारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील खरं”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

”जुलै १९९१ साली संसदेत भाषण करताना मनमोहनसिंगांनी एक वाक्य वापरलं होतं, “no power on earth can stop an idea whose time has come”. थोडक्यात भारताचा काळ सुरु होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिंग होते”, असेही राज ठाकरे म्हणाले.

”मनमोहन सिंगांवर इतिहास क्रुद्ध होणार नाही”
”पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतुंवर शंका घेतली गेली. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की”, असंही त्यांनी नमूद केलं.

”भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी ‘ये दिल मांगे मोअर..’ ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

”डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस अभिवादन”
”डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन”, असं म्हणत राज ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *