महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२७ डिसेंबर ।। माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं काल (गुरूवारी ता 26) निधन (Dr Manmohan Singh passes Away) झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. तर डॉ. मनमोहन सिंग यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच यावेळी त्यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. काही माणसं जन्माला येतात आणि जातात मात्र, काही माणसं समाज आणि देशाचा विचार करतात. त्यापैकी मनमोहन सिंग होते, असे उद्गार अण्णा हजारे यांनी काढले आहे.
त्याचबरोबर त्यांच्याबाबच्या आठवणी सांगताना अण्णा हजारे म्हणाले, आंदोलनाच्या माध्यमातून डॉ. मनमोहन सिंग यांची आणि माझी अनेक वेळा भेट झाली. नेहमी देशाविषयी आणि समाजाविषयी आस्था असणाऱ्या माणसाचे दुःखद निधन झाल्याने दुःख वाटते आहे, अशा भावना अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केल्या आहे. मनमोहन सिंग हे खऱ्या अर्थाने सच्चा माणूस होते. नेहमी देशाचा विचार करायचे निसर्गाच्या रूढीप्रमाणे माणसं येतात-जातात. मात्र, एक सच्चा माणूस गेल्याने दुःख वाटले अशी प्रतिक्रिया जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे. त्यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या पदांवरती काम केलं आहे, त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेतलेले आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे दोन वेळाचे देशाचे पंतप्रधान होते. 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक बदलांसाठी ते कायम देशवासियांच्या स्मरणात आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक, कला, क्रिडा, साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर भारतात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
