महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२९ डिसेंबर ।। राज्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडीचा जोर ओसरला आहे. काही भागांत शनिवारी गारपीट आणि अवकाळी पाऊस पडला. आजही अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातही थंडी कमी होत आहे. मात्र अवकाळी पावसामुळे कोकण किनारपट्टीवरील वातावरणात बदल झाला असून मुंबईतही तापमानात वाढ झाली आहे. तर पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळं अग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे.
उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीने तर अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींना हजेरी लावली. खानदेशात गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र पुढील चार दिवसांत पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
खानदेशात रब्बी हंगाम ऐन भरात असतानाच गारपीट, वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी व रात्री झालेल्या पावसात जळगावातील रावेर, यावल तालुक्यांत केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. गहू, मका, हरभरा, कलिंगड, पपई व अन्य भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तीन तालुक्यांना फटका बसला आहे. यात साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. गहू आणि हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने या भागामध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला होता, हा इशारा खरा ठरला असून, रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. हवामान विभागाकडूनआजही अवकाळी पावसाचा इशार देण्यात आहे.