महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जानेवारी।। देशभरामध्ये सगळीकडे नव वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. २०२४ वर्ष संपून आजपासून आपण २०२५ या वर्षात पदार्पण केले. नव्या वर्षाची सुरूवात होताच वातावरणात देखील बदल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये झालेल्या हवामान बदलांचा परिणाम नववर्षात देखील पाहायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी थंडी अन् धुके तर काही ठिकाणी हलका गारवा जाणवत आहे.
थंडीचा प्रभाव झाला कमी –
देशातील उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग आता कमी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील थंडी देखील कमी झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्येच थंडी जास्त आहे नाहीतर इतर जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रभाव खूपच कमी झाला आहे. डिसेंबरच्या अखेरीस राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झोडपून काढले.
राज्यात ढगाळ वातावरण –
पण नववर्षासोबत हवामानात देखील काहीसा बदल झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रामध्ये धुक्याची चादर पसरली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळं कमाल तापमानात काही अंशांनी वाढ होणार आहे. तर विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
तापमानात चढ-उतार –
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशातील तापमानात चढउतार पाहायला मिळाली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पण आता उत्तरेतील राज्यांमध्ये कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह आणि थंडीची लाट आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडीला पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे. तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिणेकडील राज्यात तुफान पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे .
…म्हणून महाराष्ट्रावर परिणाम –
उत्तरेकडील राज्यात देखील थंडीचा प्रभाव कमी झाला असून किमान तापमानामध्ये वाढ झाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये देखील थंडीचा प्रभाव कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होताना दिसत आहे. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. राज्याच्या किनारपट्टी भागातही ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळे थंडीचा जोर कमी होताना दिसेल. पुढील २४ तास राज्यामध्ये ही परिस्थिती कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.