देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, ‘या’ सरकारी योजनांचे पैसे आता थेट बँक खात्यात जमा होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जानेवारी।। राज्यातील विशेष लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या योजनांमध्ये दिरंगाई होणारा विलंब टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा निर्णय घेतलाय. संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ योजनेसारख्या विशेष सहाय्य योजनांचे पैसे महाडीबीटीमधून आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करून कालापव्यय टाळण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी दिले आहेत. मंत्रालयातून विभागीय आयुक्त मग जिल्हाधिकारी आणि तिथून तहसील कार्यालय करत लाभार्थ्यांना या योजनांचे पैसे मिळतात. त्यामुळे यासाठी बरेच दिवस लागतात.जिल्हाधिकाऱ्यांसह आणि पोलिस प्रमुखांसोबत नियमित आढावा बैठका घेऊन प्रकल्प विकासकामांना वेग देण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.सह्याद्रीवर मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

ऑनलाईन प्रक्रीया अद्ययावत करा- मुख्यमंत्री
सामाजिक न्याय विभागाच्या 100 दिवसांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यात याव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. शासकीय वसतिगृह इमारतींची आवश्यक दुरुस्ती करावी, वसतिगृहांत सोयी वेळेत मिळतील याची खात्री करावी. तसेच त्यांची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन करावी. जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाइन करावी. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य पेन्शन योजनेसाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) तत्काळ लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

येत्या 15 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा महाराष्ट्र ॐ शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून प्रकल्प विकासकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी नियमित आढावा बैठक घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात. यासंदर्भातील अहवाल येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.तसेच जलजीवन मिशन योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्याचा सहभाग अधिक दिसावा यासाठी योजनेची कामे मिशन मोडवर करून ही योजना संपूर्ण सौर ऊर्जेवर आणावी.

निराधार व श्रावणबाळ याेजना
राज्यात निराधार वृध्द व्यक्ती, अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार योजना सन 1980 पासून राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत सध्या प्रतिमाह प्रति लाभार्थी रु.1500/- एवढे अनुदान त्यांच्या बँक खात्यात DBT व्दारे देण्यात येत आहे.श्रावणबाळ योजना ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील वृद्धांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली पेन्शन योजना आहे. 300 ते 600 रुपये मासिक पेन्शन ऑफर करून 65 वर्षे ओलांडलेल्या व्यक्तींना मदत करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *