✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २३ डिसेंबर २०२५ | सोनं म्हणजे भारतीय माणसाचा जिव्हाळा—लग्नात, सणात, संकटात आणि सुरक्षिततेसाठीचा अखंड आधार. पण आता हेच सोनं हळूहळू दागिन्यांतून बाहेर पडून थेट लक्झरीच्या वर्गात जाणार असल्याचं चित्र समोर येत आहे. कारण अर्थतज्ञांचा अंदाज धक्कादायक आहे—सोनं थेट तीन लाख रुपयांचा टप्पा पार करू शकतं!
अमेरिकेचे नामवंत अर्थतज्ञ आणि दिग्गज मार्केट रणनीतीकार एड यार्डेनी यांनी या दशकाच्या अखेरपर्यंत सोन्याच्या दरात मोठी उसळी येईल, असा ठाम अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, २०२९ पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर १०,००० डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो. सध्या हा दर सुमारे ४,४१० डॉलर प्रति औंस आहे. म्हणजेच पुढील काही वर्षांत सोन्याच्या किमतीत तब्बल १२७ टक्क्यांची वाढ होऊ शकते—अडीच पट!
हा अंदाज भारतीय बाजाराच्या गणितात बसवला, तर चित्र आणखीच थक्क करणारं आहे. सध्या एमसीएक्सवर सोन्याचा दर १,३५,८९० रुपये आहे. जर याच दरात १२७ टक्क्यांची तेजी आली, तर २०२९ पर्यंत भारतात सोन्याचा भाव थेट ३.०८ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. “पूर्वी सोनं तिजोरीत ठेवायचं, आता ते फक्त चर्चेत ठेवावं लागेल!”
आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कच्या कॉमेक्सवर सध्या सोन्याचा दर ४,४०० डॉलर प्रति औंस आहे. २२ डिसेंबर रोजी सोन्याने उच्चांक गाठला होता. जागतिक राजकीय अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती, वाढती महागाई, डॉलरची चढउतार आणि मध्यवर्ती बँकांची सोन्याकडे वाढलेली गुंतवणूक—या सगळ्यांचा थेट फायदा सोन्याला होत आहे.
आजच्या दरांकडे पाहिलं, तरी तेजीचा वेग स्पष्ट दिसतो. सराफा बाजारात सोन्याच्या दरात १,८०५ रुपयांची वाढ झाली असून २४ कॅरेट सोन्याचा दर १,३७,५९१ रुपये प्रति तोळा झाला आहे. २२ कॅरेट सोनं १,६५३ रुपयांनी वाढून १,२२,३६३ रुपयांवर पोहोचलं असून जीएसटीसह हा दर १,२६,०३३ रुपये झाला आहे.
चांदीही मागे नाही. एक किलो चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ झाली असून जीएसटीसह दर २,१३,७७६ रुपये झाला आहे. विशेष म्हणजे, २०२५ या एकाच वर्षात सोनं ५७,८८४ रुपयांनी, तर चांदी तब्बल १,२१,५३३ रुपयांनी महागली आहे.
एकूण काय, सोनं आता फक्त सुरक्षित गुंतवणूक नाही, तर भविष्यातील मौल्यवान स्वप्न बनत चाललं आहे. आज घेणारा शहाणा, उद्या पाहणारा थक्क—आणि ज्याने दुर्लक्ष केलं, तो फक्त एवढंच म्हणेल, “तेव्हा घेतलं असतं तर…!”
