महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३ जानेवारी।। कोव्हिडचे निमित्त करून घरपोच औषध पुरवण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मना दिलेल्या विशेष परवानगीचा गैरवापर होत आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. दिलेले आदेश तात्काळ मागे घ्यावा अन्यथा देशभरातील १२ लाख ४० हजार औषध विक्रेते बंद पुकारतील असा इशारा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट आणि महाराष्ट्र संघटनेने दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे आणि सरचिटणीस राजीव शिंगल यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहून हा इशारा दिला आहे. याबाबत वाशिम जिल्हा केमिस्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील शिरसाट, सचिव नंदकिशोर झंवर यांनी वाशिम जिल्यातून एक प्रसिद्ध पत्रक दिले आहे. कोव्हिडच्या आपतकालीन परिस्थितीत दिलेली परवानगी अद्यापही सुरू आहे. काही डिजिटल प्लॅटफॉर्मवर नियम व अटीचे पालन न करता घरपोच औषधे पुरवण्यात येत आहेत. यामध्ये प्रिस्क्रीप्शनचीसुद्धा मागणी केली जात नाही. यामुळे स्वचिकित्सा, नशेसाठी औषधांचा गैरवापर आणि प्रतिजैविक प्रतिकारशक्ती यासारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्म त्यांच्या केवळ नफ्याकडे लक्ष देऊन सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष करत आहेत.
महामारीचा टप्पा संपुष्टात आल्याने जुनी अधिसूचना रद्द करावी, औषध विक्री आणि वितरणासाठी सुरक्षा नियम कठोर करावेत, देशभरातील अवैध ऑनलाईन औषध विक्री तात्काळ थांबवावी. ती जर थांबली नाही तर १२ लाख ४० हजार औषध विक्रेते बंद पुकारतील असा इशारा देण्यात आला आहे.