महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३ जानेवारी।। इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले असून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्ती म्हणजे एक दिवसाचा कार्यक्रम नसल्याचे म्हटले आहे. नदी प्रदूषण मुक्तीसाठी व्यापक कार्यक्रम राबवावा लागणार असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. इंद्रायणी नदीत सगळ्या शहराचे, उद्योगाचे, गावांचे सांडपाणी प्रक्रिया न करता येऊन मिळत आहे. त्यावर प्रक्रिया होऊन शुद्ध पाणी नदीत सोडले जाईल, यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार असून महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपरिषद यांना निधी देण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आळंदी येथे सांगितले.
स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या आश्रमातील संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमाकरिता मुख्यमंत्री आळंदी आले होते. यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डूडी, आमदार हेमंत रासने, उमाताई खापरे यादेखील उपस्थित होत्या.
पांडुरंगाच्या आशीर्वादाने एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला आहे. त्यानंतर आळंदीला येऊन माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली ही प्रत्येकासाठी भाग्याची गोष्ट असते, सुखाचा क्षण असतो. तो क्षण मला अनुभवता आला याचा मला आनंद आहे. निश्चितपणे आमची जी संत परंपरा आहे, ज्ञानेश्वर माऊलींपासून जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत हा जो विचार आहे या विचारानेच महाराष्ट्र पुढे गेला आहे आणि पुढे जात राहील. याच विचाराची आठवण आम्हाला होत राहावी म्हणून प्रफुल्लित होण्यासाठी आम्ही याठिकाणी येत असतो, असे फडणवीस म्हणाले.
यावेळी आळंदी देवस्थान तर्फे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी मुखमंत्री यांचा भगवा फेटा, शाल, श्रीफळ, उपरणे, तुळशी हार व माऊलींची प्रतिमा, तसेच ज्ञानेश्वरी देत सन्मान केला. यावेळी देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, प्रसिध्दी प्रमुख उमेश बागडे व इतर मान्यवर उपस्थित होते.