Pune News : दुचाकी घेताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणं अनिवार्य, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३ जानेवारी।। पुण्यात अनेकदा हेल्मेटसक्ती झाली, पण नंतर ती शिथिल देखील झाली, त्यानंतर आता पुण्यात दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीने देखील हेल्मेट घालावे यासाठी पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवी युक्ती शोधली आहे. पुण्यात दुचाकी विकणाऱ्या शोरूमला दुचाकी खरेदी केल्यानंतर हेल्मेट देण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नवी दुचाकी विकताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे आता अनिवार्य असणार आहे. वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे शोरूममधून दुचाकीची विक्री करणाऱ्यांना दोन हेल्मेट देणं बंधनकारक असणार आहे. मात्र, यामुळे दुचाकींच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

वाढणारे अपघात, गाड्यांची संख्या, वाहतूक कोंडी यामुळे नियम अधिक कडक करणं आवश्यक आहे. त्यासाठी आता पुण्यातील दुचाकीस्वारांसह मागे बसणाऱ्यांनी हेल्मेट नियमित घालावे यासाठी पुणे परिवहन विभागाने मोठे आदेश दिले आहेत. यासंबधीचे एक पत्रक देखील त्यांनी काढलं आहे.

पत्रकात काय म्हटलं आहे?

भारतात व महाराष्ट्रात रस्ते अपघातात दुचाकी वाहनचालकांची बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच दुचाकी अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. दुचाकीस्वारांनी जर हेल्मेटचा वापर केला तर अपघातामध्ये होणा-या मृत्युंच्या संख्येमध्ये निश्चित घट होवू शकते. त्यामुळे वाहनचालकाने स्वतः आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणा-या हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. तसेच केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 138 नुसार नविन दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना, खरेदीवेळी वाहन वितरकाने दोन हेल्मेट पुरविणे आवश्यक आहे. याबाबत दुचाकी वितरकांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. नविन दुचाकी खरेदी करणाऱ्या सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, वाहन ताब्यात घेतेवेळी वाहन वितरकाकडून दोन हेल्मेट प्राप्त करून घ्यावीत, असं पत्रकामध्ये लिहलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *