महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जानेवारी ।। पुण्यामध्ये राहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पुणेकरांना थेट पुण्यातून प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी जाता येणार आहे. कारण कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष ट्रेन धावणार आहे. कुंभमेळ्यासाठी रेल्वेच्या ‘आयआरसीटीसी’मार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांना कुंभमेळ्याला जाणं सोपं होणार आहे. त्यासाठी ही ट्रेन कधी आणि कुठून सुटणार आहे याबाबतची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
१५ जानेवारीच्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही विशेष ट्रेन पुण्यातून कुंभमेळ्यासाठी सुटेल, अशी माहिती ‘आयआरसीटीसी’चे टुरिझम व्यवस्थापक सुभाष नायर यांनी दिली. केंद्र शासनाच्या ‘देखो अपना देश’ या योजनेअंतर्गत भारतगौरव ही विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे देशभरातून आतापर्यंत ८६ रेल्वे गाड्या धावल्या आहेत.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये यंदा कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा होणार आहे. तब्बल ४४ दिवस चालणाऱ्या या कुंभमेळ्यात फक्त देशातीलच नाही तर परदेशातील कोट्यवधी भाविक सहभागी होत असतात. यंदा देखील मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे.