महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जानेवारी ।। सोन्यानंतर आता ग्राहकांना लवकरच चांदीच्या शुद्धतेची देखील हमी मिळेल. मौल्यवान सोन्याप्रमाणेच चांदीसाठी देखील ‘हॉलमार्किंग’ अनिवार्य करण्याचा सरकार विचार करत आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजे BIS ला त्याच्या व्यावहारिक पैलूंचे मूल्यांकन करण्यास सांगितले असल्याची माहिती अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी दिली. सरकारने ही बाब प्रत्यक्षात आणल्यास ग्राहकांना मोठा फायदा होऊ शकतो. चांदीच्या विश्वासार्हतेबद्दल त्यांची चिंता मिटेल. हॉलमार्किंग म्हणजे काय ?
लवकरच चांदीवरही हॉलमार्क अनिवार्य?
सर्व काही प्लॅनिंगनुसार झाल्यास लवकरच तुम्हाला सोन्याप्रमाणे चांदीतील भेसळीपासून मुक्ती मिळेल. ७८ व्या बीआयएस स्थापना दिन कार्यक्रमात जोशी म्हणाले, “चांदीच्या ‘हॉलमार्किंग’साठी ग्राहकांकडून मागणी करण्यात आली आहे. BIS यावर चर्चा करून निर्णय घेऊ शकते. त्या दिशेने काम सुरू झाल्याचे मंत्र्यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगितले असून भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर आणि BIS द्वारे व्यवहार्यता मूल्यांकन पूर्ण केल्यानंतर सरकार निर्णय घेईल.” तसेच त्यांनी पुढे म्हटले की BIS ला व्यवहार्यतेवर काम करण्यास सांगितले आहे आणि ग्राहक व ज्वेलरी (सोनार) विक्रेत्यांकडून फीडबॅक देखील घेण्यास सांगितले आहे.
सध्याच्या ‘हॉलमार्किंग’ प्रणालीमध्ये सहा अंकी ‘अल्फान्यूमेरिक कोड’ असतो, जो सोन्याची शुद्धता प्रमाणित करतो. चांदीचे हॉलमार्किंग भारतातील मौल्यवान धातूंच्या गुणवत्ता नियंत्रण उपायांना बळकट करेल जेणेकरून चांदी आणि चांदीच्या वस्तूंतील भेसळ दूर होणार असून ग्राहकांना योग्य माल मिळणे सोपे होणार आहे. चांदीचे हॉलमार्किंग म्हणजे सध्या पांढऱ्या धातूची शुद्धता प्रमाणित करणे ज्वेलर किंवा ग्राहकाच्या इच्छेवर अवलंबून असते.
सोन्यावर हॉलमार्क अनिवार्य
सरकारने २०१९ मध्येच सोन्याची शुद्धता निश्चित करण्यासाठी हॉलमार्किंग अनिवार्य केले होते. सोन्याची शुद्धता २४ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट आणि १४ कॅरेटमध्ये विभागली जाते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने यासाठी एक नंबर निर्धारित केला आहे. उदाहरणार्थ २२ कॅरेट सोन्याचे हॉलमार्किंग BIS ९१६ तर २३ कॅरेटचे हॉलमार्किंग BIS ९५८, २२ कॅरेट सोन्यावर ९१.६०% सोने असते तर २४ कॅरेटमध्ये ९९.९ टक्के सोने असते.
चांदीवर हॉलमार्किंगचा निर्णय कधीपर्यंत?
बीआयएसचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी म्हणाले की, “ब्युरो तीन ते सहा महिन्यांत चांदीचे ‘हॉलमार्किंग’ अनिवार्य करू शकते. संबंधितांशी चर्चा सुरू असून तिवारी म्हणाले, ‘हितधारकांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत, ते त्यास अनुकूल आहेत. सहा अंकी ‘अल्फान्यूमेरिक कोड’वर चर्चा सुरू आहे.”