E-Cabinet: राज्यात आज होणार ई-कॅबिनेट बैठक; मंत्र्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जानेवारी ।। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ई-कॅबिनेटची संकल्पना राबविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज, मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच या प्रयोगाचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

ई-कॅबिनेटच्या दृष्टीने गेल्या दोन दिवसांपासून प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाल्याची माहिती पुढे आली आहे. मंगळवारच्या बैठकीत या प्रयोगाची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ही संकल्पना याआधी हिमाचल प्रदेश, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनी राबवली आहे.

कॅबिनेट ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर प्रशासनाने या संकल्पनेची तयारी सुरू केली होती. अखेर ही तयारी पूर्ण झाली असून आज, मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच ई-कॅबिनेट संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना टॅबचे वाटप केले जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

एखाद्या कागदपत्रावर स्वाक्षरीसाठी टॅबवर ओटीपी आधारित प्रणाली राबवण्यात येणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून रीअल टाइम डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे. याशिवाय या प्रणालीच्या माध्यमातून मागील काही बैठकींची किंवा निर्णयांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. ई-कॅबिनेट ही संकल्पना राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) मदतीने तयार करण्यात येणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळाची बैठक पेपरलेस होणार आहे. या उपाययोजनेमुळे मंत्र्यांना कॅबिनेट बैठकीची तयारी करता येते. ही प्रणाली कमी खर्चाची आणि पर्यावरणपूरक असल्याने त्याचा उपयोग केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेमके काय होणार ? संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीतील प्रस्तावांचे टिपण व इतर माहिती टॅबवर उपलब्ध करून दिली जाईल. या टॅबसाठी एक यूआयडी क्रमांकही दिला जाणार आहे. प्रस्तावांबाबत एखाद्या मंत्र्यांना आक्षेप अथवा सूचना नोंदवायची असेल तर तशी व्यवस्था टॅबवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *