महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जानेवारी ।। दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानवर १० विकेट्सने विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घातली. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा सलग सातवा कसोटी विजय आहे. या कसोटीत फॉलोऑन मिळूनही पाकिस्तानचे जबरदस्त खेळ केला, परंतु त्यांचे फलंदाज नंतर ढेपाळले.
रायन रिकेल्टनने पदार्पणाच्या सामन्यात ३४३ चेंडूंचा सामना करताना २९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने २५९ धावा कुटल्या. त्याला कर्णधार टेम्बा बवूमा ( १०६) व कायले वेरेयने ( १००) यांच्या शतकांची साथ मिळाली. मार्को यान्सने ( ६२) व केशव महाराज ( ४०) या तळाच्या फलंदाजांनीही पाकिस्तानी गोलंदाजांना झोडले. आफ्रिकेने पहिल्या डावात ६१५ धावा उभ्या केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद अब्बास व सलमान आघा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानचा पहिला डाव १९४ धावांवर गुंडाळून दक्षिण आफ्रिकेने त्यांच्यावर फॉलोऑन लादला. बाबर आझम ( ५८) आणि मोहम्मद रिझवान ( ४६) हे अनुभवी खेळाडूच चांगले खेळले. कागिसो रबाडाने ३, तर क्वेमा माफाका व केशव महाराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात पाकिस्तानने चांगला खेळ केला.
सलामीवीर व कर्णधार शान मसूद व बाबर यांनी संघाला २०५ धावांची सलामी दिली. बाबर ६१ धावांवर माघारी परतल्यानंतर मधळी फळी पुन्हा अपयशी ठरली. रिझवान ( ४१), सलमान आघा ( ४८) व आमेर जमाल ( ३४) यांनी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. मसूदने २५१ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने १४५ धावा केल्या. पाकिस्तानचा दुसरा डाव ४७८ धावांवर गुंडाळला गेला आणि आफ्रिकेसमोर विजयासाठी ६१ धावांचे लक्ष्य ठेवले गेले.
आफ्रिकेच्या रबाडा व केशव महाराज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. फॉलोऑन मिळाल्यानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांमध्ये पाकिस्तानने दुसरे स्थान पटकावले. भारताने १९६७ मध्ये इंग्लंडविरुद्ध हेडिंग्ले कसोटीत फॉलोऑननंतर ५१० धावा केल्या होत्या आणि त्यानंतर पाकिस्तानचा नंबर येतो. डेव्हिड बेंडिगहॅम ( ४७) व एडन मार्कराम ( १४) यांनी आफ्रिकेला ७.१ षटकांत विजय मिळवून दिला.