Dhananjay Munde: मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिलेला नाही; धनंजय मुंडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जानेवारी ।। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन कोंडीत सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत धनंजय मुंडे यांनी व्यथित होऊन मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या कालपासून ऐकायला मिळत आहेत. मात्र, धनंजय मुंडे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना, ‘काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही’, असे स्पष्टपणे सांगितले. यावेळी धनंजय मुंडे यांच्या देहबोलीत पुरेपूर आत्मविश्वास दिसत होता. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड अडकले असले तरी धनंजय मुंडे यांच्यावर थेट कोणताही ठपक नाही. त्यामुळे एसआयटी आणि सीआयडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होईपर्यंत धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे अजितदादांनी तुर्तास धनंजय मुंडे यांना अभय दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा आत्मविश्वास अजूनही टिकून असल्याची चर्चा आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीसाठी मंगळवारी सकाळी धनंजय मुंडे हे मंत्रालयात आले होते. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याचे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले. संतोष देशमुख हत्याप्रकरणात बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात एकटवले आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाची माहिती दिली होती. या सगळ्यामुळे अजित पवार यांच्यावर धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घेण्यासाठीचा दबाव वाढला आहे. अजित पवार यांनी तुर्तास धनुभाऊंना अभय दिले असले तरी ते सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले होते. या सगळ्या घटनाक्रमानंतर धनंजय मुंडे यांचे बीडचे पालकमंत्रीपद जवळपास गेल्यात जमा आहे. मात्र, आता विरोधकांचा दबाव कायम राहिल्यास धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद तरी कायम राहणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *