राज्यात वाढणार थंडीचा जोर : 8 जानेवारीनंतर हवामानात होणार मोठे बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जानेवारी ।। उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून, ही थंडी आता येत्या काळात अडचणींमध्ये आणखी भर पाडताना दिसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. देशात सध्या राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशासह हिमाचल आणि काश्मीर, उत्तराखंडमध्येही थंडीचा कडाका वाढत असल्यामुळं उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा महाराष्ट्रावरही थेट परिणाम होताना दिसणार आहे.

शुक्रवारपर्यंत कायम राहणार थंडीचा जोर
थंडीमुळे पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्र गारठला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमान 13 अंशांवर पोहोचलं असून, मुंबई शहरातही तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार असून, त्यानंतर मात्र तापमानवाढीस सुरुवात होईल.

उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे थेट मुंबईसह राज्यभरातील थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर मात्र 11 जानेवारीपासून पुन्हा तापमानवाढीस सुरुवात होणार असून, मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टी क्षेत्रामध्ये हे बदल तुलनेनं अधिक वेगानं दिसून येतील. सध्या स्वच्छ सूर्यप्रकाशामुळं राज्यातील काही भागांमध्ये तापमानवाढीस सुरुवात होणार असून, हा आकडा 30 ते 34 अंशांमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणत्या भागांना धुक्यासह थंडीच्या लाटेचा अलर्ट?
हवामान विभागाच्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशासह मध्य प्रदेशात हवामान विभागानं शीतलहरीचा इशारा जारी केला आहे. तर, हिमाचल, राजस्थानलाच धुक्याचाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, तिथं अरुणाचल प्रगेशात ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल असा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे.

IMD च्या निरीक्षणानुसार पुढील पाच दिवसांत अर्थात 8 जानेवारीनंतर देशातील हवामानात मोठे बदल होणार असून, उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होणार असून, त्यानंतर पुन्हा एकदा तापमानवाढीस सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान विभागानं जारी केली आहे. सध्या काश्मीर आणि हिमाचलमध्ये हिमवृष्टीचं प्रमाण वाढलं असून, इथं स्थानिकांसह पर्यटकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *