महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जानेवारी ।। जोपर्यंत शरद पवार यांचे खासदार फोडले जात नाही तोपर्यंत अजित पवार गटाला मंत्रिपद मिळणार नाही. हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. पटेलांना सांगण्यात आलं आहे की, केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे तो तुम्ही पूर्ण करा. त्यासाठी पवार गटाचे सहा ते सात खासदार फोडल्यावर तुमचा खासदार पकडून आकडा पूर्ण होईल तेव्हा पटेलांना मंत्रिपद मिळेल. याचा महाराष्ट्राला आणि देशाला काही उपयोग नाहीये. प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचंय म्हणून पवारांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण हा नीच आणि निर्लज्जपणा आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात तरीसुद्ध फोडाफोडीची हौस भागत नाही. कार्यकर्तें फोडा, पदाधिकारी फोडा, आमदार फोडा, खासदार फोडा काय चाल्लंय, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाचे खासदार फोडण्याचे प्रयत्न आहेत यावरही राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
किती संपर्कात आहेत त्यांनी नावं जाहीर करावं. आमच्याही संपर्कात आहे असं आम्ही म्हटलं तर, पण मी बोलणार नाही. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत. ईडी, सीबीआय आणि पैसा आहे. पण भाजपला किती आमदार, खासदार पाहिजेत त्यांचं भविष्य काय? काय देणार आहेत. तोंडावर हाडकंच चघळायला पडणार आहेत. आमचे किंवा शरद पवार गटाचे प्रयत्न होतायेत याच्यामध्ये देंवेद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा मुखवटा गळून पडला जात आहे. मरेपर्यंत तुम्ही हेच करणार आहात का? तुमच्यासुद्धा राजकारणातून तिरढ्या उचलल्या जाणार आहेत. इतिहासामध्ये यांची नोंद वाईट शब्दामध्ये म्हणजे लोकशाहीची महाराष्ट्राची वाट लावणारे लोक असा उल्लेख केला जाणार आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
भारताच्या निवडणूक आयोगामध्ये घोटाळा आहे. संपूर्ण जगाने ईव्हीएम नाकारलं आहे, हे शहाणे आलेत का? राजीव कुमार निवृत्त झाल्यावर त्यांना अमित शहा, नरेंद्र मोदी बक्षीस देतील. राज्यपाल करतील, केंद्रीय महामंडळ देतील किंवा कुठे राजदूत म्हणून पाठवतील. महाराष्ट्रात निवडणूक घोटाळा झालेला आहे. हरियामध्येही हा घोटाळा झालाय. मरकडवाडीमध्ये निवडणूक आयोगाने जाऊन बसावं, त्यांना तफावत दिसला असता. दिल्ली निवडणुकीमध्येसुद्धा मतदारयादीमध्ये घोटाळा झाला तो दिल्लीमध्ये होतोय. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.