महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जानेवारी ।। चीनमधून आलेल्या एचएमपीव्ही विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर असताना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात काही गावांमध्ये एक विचित्र साथीमुळे नागरिक दहशतीत आले आहेत. तीन दिवसातच काही जणांचे केस गळून टक्कल पडत असल्याने नागरिक हैराण आहेत. जाणून घेऊया नेमकं काय घडलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा येथे चक्क तीन दिवसातच काही जणांचे केस गळून टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे. ही समस्या नेमकी का डोकं वर काढत आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
अनेक कुटुंबांतील सदस्यांना लागण
शेगाव तालुक्यातील बोडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात कारणामुळे केस गळतीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेक कुटुंबातील सदस्य याचा बळी ठरत आहेत. अगोदर डोक्याला खाज येणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसात तिन्ही गावातील शेकडो नागरिकांची केस गळती झाली आहे. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे हा प्रकार होऊनी आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेतच असल्याने संताप व्यक्त होत आहे.
शॅम्पूवर संशय
नागरिक खाजगीत उपचार घेत आहे. शॅम्पूमुळे असा प्रकार घडत असावा असे डॉक्टरांचे प्राथमिक मत आहे, मात्र आयुष्यात कधीही शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस गळत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाने कोणती कारवाई केली नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या तिन्ही गावांमध्ये उद्भवलेल्या समस्येबाबत उपचार शिबिर घेण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
पाण्याचा स्त्रोत दूषित आहे का? याची चाचपणी होत आहे. तसेच पाण्याचे जडपणा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. काही रुग्णांनी त्वचारोग तज्ज्ञांकडे उपचार घेतले असता शॅम्पूमुळे असा प्रकार होऊ शकतो अशी माहिती आहे. मात्र याला कुठेच दुजोरा देण्यात आला नाही आहे.
सर्वेक्षणात आढळले ३० पेक्षा जास्त बाधित
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने भोन गावात सर्वेक्षण केले त्यामध्ये केस गळतीच्या आजाराने ३० जण बाधित असल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबत पुढील योजना करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आहे. त्यांच्याकडून रुग्णांची लक्षणं पाहून उपचार सुरू करण्यात आले आहे. एकीकडे जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य मंत्री असताना नेमकं अशा घटना पुढे आल्यानंतर उपाययोजना आणि तत्पर पावले का उचलली जात नाहीत, हा देखील एक प्रश्न आहे.